आमचा विरोध ‘ए गँग’ला… पटोलेंच्या विधानाने हास्यकारंजे

काँग्रेस आमदार नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुगलबंदी झाली. अवघ्या तीन महिन्यांत 57 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सरकार मांडत आहे याचा अर्थ राज्याचे आर्थिक दिवाळे निघाले आहे, असे पटोले म्हणाले. त्यावर सत्ताधारी बाकावरून ‘लाडकी बहीण’ योजनेला विरोध आहे का? असा प्रश्न विचारला गेला. कोण म्हणालं? असा सवाल करत पटोले इकडेतिकडे बघत असतानाच, एकनाथ शिंदे यांनी ‘अदानी’ला विरोध आहे? अशी टिप्पणी केली. त्यावर तातडीने पटोले यांनी, आमचा ‘ए गँग’ला विरोध आहे, असे म्हणताच सभागृहात हास्यकारंजे फुटले. मुंबईत पहिली ‘डी गँग’ होती, आता ‘ए गँग’ आली आहे. त्यामुळे मूठभर लोकांसाठी सरकार चालतेय का अशी भावना राज्यातील जनतेची झाली आहे, असे पटोले म्हणाले.