
अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा मृत्यू अँटीएजिंगचे इंजेक्शन घेतल्यामुळे झाल्याचे समोर आले. दिवसभर उपवास करून तिने हे इंजेक्शन घेतले आणि रक्तदाब वाढून तिला हृयविकाराचा झटका आला. त्वचा तुकतुकीत दिसण्यासाठी अनेक तरुण-तरुणी असे इंजेक्शन घेतात. हे जिवावर बेतू शकते, असा इशारा त्वचाविकारतज्ञ डॉ. तुषार जगताप दिला आहे.
तरुण-तरुणींनी अँटिएजिंगचे इंजेक्शन, सौंदर्य वाढवण्यासाठीची औषधे व क्रीम्स वापरूच नयेत. यात व्हिटॅमीन-एचा डोस वाढला तर केसगळती होण्याचा धोका असतो. सध्या गोरी नावाची क्रीम तरुणी खूप वापरतात. यातील स्टेरॉईडमुळे चेहरा काळा पडतो. चेहरा, छाती, पाठीवर पुरळ येतात. अँटिएजिंग ग्लुटाथिओन इंजेक्शनचा डोस मोठ्या प्रमाणावर घेतल्यास कार्डियाक अॅरेस्टचाही धोका वाढतो, असे जगताप म्हणाले.
जुने आजार पाहूनच उपचार
त्वचाविकारावर उपचार घेताना संबंधित व्यक्तीला मधुमेह किंवा इतर अनुवांशिक आजार आहेत का, याची तपासणी करावी लागते. त्यानुसार औषधोपचार करण्यात येतात, असे डॉ. जगताप म्हणाले.
सोरायसीसवर आयुर्वेदिक उपचारांमुळे किडन्या फेल
सोरायसीससारख्या आजारावर अनेक जण घरगुती उपाय किंवा कुठल्याही रस्त्यावरील बोगस डॉक्टरकडे जाऊन आयुर्वेदिक उपचार घेतात, भस्म लावतात. यामुळे किडन्या फेल झालेले अनेक रुग्ण माझ्याकडे आले आहेत, अशी माहिती त्वचाविकारतज्ञ डॉ. रुचिता धुरत यांनी दिली. तुम्ही योग्य डॉक्टरकडून उपचार करून घ्याल तर ते तुमच्यासाठीच चांगले आहे. मी ग्लुटाथिओन इंजेक्शन देण्याच्या विरोधात नाही. परंतु ते तुम्ही कुठल्या डॉक्टरकडून घेता. तजेलदार स्वचेसाठी तुम्ही कुठल्या डॉक्टरकडून उपचार करून घेता ते महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या.