
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू आहे. मात्र तलासरी तालुक्यातील झरी गावातील प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे गोदाम वादाच्या भोक्ऱ्यात अडकले आहे. अकृषिक जमिनीचा बेकायदेशीर वापर सुरू असून बिगर आदिवासी खातेदाराने जमीन साई सौभाग्य डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून एल अँड टी कंपनीला परस्पर गोदामासाठी भाड्याने दिली आहे.
झरी गावातील संबंधित जमीन ‘गोळा प्लॉट’ प्रकारात मोडते. यामध्ये अनेक खातेदार आहेत. यातील बिगर-आदिवासी खातेदारांनी आपली जमीन २०११ साली एका दुसऱ्या कंपनीला विकली होती. या विक्री प्रक्रियेदरम्यान लगतच्या आदिवासी सातबाराधारकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जमिनीची मोजणी करण्यात आली. ही जमीन अद्याप अकृषिक झालेली नसतानाही या जागेवर सध्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री ठेवण्यात आली आहे. याबाबतची तक्रार तहसील कार्यालयात आदिवासींनी केल्यानंतर तहसीलदार अमोल पाठक यांनी अकृषिक जागेचा व्यावसायिक वापर करता येत नाही. याविषयी स्थळ पाहणी करून दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला.
बुलेट ट्रेनचे काम करणाऱ्या कंपनीचे गोदाम आमच्या सामायिक जमिनीवर आहे. या जमिनीची खरेदी विक्री करताना आम्हाला कोणतीही प्रकारची नोटीस बजावण्यात आलेली नाही. याविषयी आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना अथवा मोबदला दिला नाही.
माह्या शिंगडा, खातेदार शेतीवर उदरनिर्वाह
झरी येथील ही सामायिक जमीन गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होती. परिसरातील आदिवासी साधारण ४० वर्षांपासून या जमिनीवर शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. अनेकांची नावे जमीन वहिवाटदार म्हणून आहेत. असे असताना एका कंपनीकडून ही जमीन परस्पर व्यावसायिक वापरासाठी भाड्याने देण्यात आल्यामुळे आदिवासींच्या रोजगारावर याचा परिणाम झाला असून त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे