
माळशेज महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य आहे. प्रशासनाने महामार्गावरचे खड्डे भरण्यासाठी केवळ थुकपट्टी केली आहे. कल्याण – अहिल्यानगर हायवेवर तर भरपावसात सिमेंट क्राँकीट रस्त्याचे काम सुरू आहे. कहर म्हणजे ठेकेदाराने रस्त्याच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल चालवली आहे. विकासाच्या नावाखाली डोळ्यांदेखत पर्यावरणाचा सत्यानाश सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.
कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील मुरबाड तालुक्यातील उमरोली ते वैशाखरेपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला पावसाळ्यात मुहूर्त सापडला आहे. मेपूर्वी रस्त्याचे काम करावे अशी मागणी करूनही त्याकडे बांधकाम विभाग आणि ठेकेदाराने दुर्लक्ष केले. मुसळधार पावसात कासव गतीने काम सुरू आहे. पावसात केलेल्या सिमेंट क्राँकीट कामावर प्लास्टिक पसरून ठेवले असले तरी त्यातून सिमेंट बाहेर वाहून जात आहे. केवळ खडी आणि वाळूच शिल्लक राहत आहे. ठेकेदाराने चार किलोमीटर एवढ्या जागेवर रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. उमरोली ते मोरोशीपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली मोठमोठी झाडे पोकलॅनने मुळासकट उखडून टाकली आहेत. विकासाच्या नावाखाली झाडांचे मुडदे पाडले जात आहेत. ठेकेदार झाडे तोडत असूनही टोकावडे वनविभाग डोळ्याला पट्टी बांधून बसल्याबद्दल पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला.
मृत्यूचा सापळा
दिवसरात्र दळणवळण यंत्रणेसाठी वापरात असलेला हा महामार्ग सध्याच्या परिस्थितीत मृत्यूचा सापळा बनला असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख सतीश घरत यांनी केला आहे. ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम करून ठिकठिकाणी खडी व मातीचे ढिगारे आणून ठेवल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असून अपघात वाढले आहेत.