मुंबईतल्या धोकादायक टेकडय़ा आणि डोंगरांचा जिऑलॉजिकल सर्व्हे, सुनील राऊतांनी वेधले लक्ष

मुंबईत डोंगर आणि टेकडय़ांवर नवीन अतिक्रमणे होत आहेत. डोंगर फोडले जात असल्याने टेकडय़ांच्या पायथ्याशी असलेल्या वस्त्यांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे भूस्खलनाची भीती असलेले डोंगर आणि टेकडय़ांचे जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामार्फत नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत केली.

मुंबई शहरातील डोंगराळ वस्तीत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या समस्येकडे लक्ष वेधताना सुनील राऊत म्हणाले की, विक्रोळी सूर्यानगर या डोंगराळ भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेकडे लक्ष वेधले. ज्या ठिकाणी दरड किंवा भिंती कोसळण्याची शक्यता आहे अशा लोकांना तत्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणार का? सूर्यानगरसाठी 20 ते 22 कोटी रुपयांचा निधी सरकार देणार का? जिओ नेटिंगच्या कामासाठी 9 कोटी रुपये मंजूर आहेत, पण सूर्यानगर हा डोंगराळ भाग असल्याने जिओ नेटिंगचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे नऊ मीटरच्या उंचीच्या भिंतीसाठी हा निधी वर्ग करणार का, असा प्रश्न सुनील राऊत यांनी उपस्थित केला.

या चर्चेला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी भूस्खलनाचा धोका असल्याच्या ठिकाणाचे जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामार्फत 2017 मध्ये सर्वेक्षण झाल्याचे सांगत त्यांनी धोकादायक आणि अतिधोकादायक ठिकाणांची यादी दिली. त्यावर हा सर्व्हे आठ वर्षांपूर्वी झाल्याचे काही सदस्यांनी निदर्शनास आणले. त्यावर धोकादायक ठिकाणाचे नव्याने सर्वेक्षण करण्याची घोषणा त्यांनी केली.

संरक्षक भिंतीसाठी तुटपुंजा निधी

या चर्चेत भाग घेताना अजय चौधरी यांनी त्यांच्या मतदारसंघातील वाघेश्वरी नगर,  जिजामाता नगर, परशुराम नगर या सर्व टेकडय़ांच्या खाली वसलेल्या वस्त्यांकडे लक्ष वेधले आणि संरक्षक भिंतीसाठी निधीची मागणी केली. मुंबईत शुशोभीकरणाच्या नावाखाली 1700 कोटी रुपये खर्च होतात, पण संरक्षक भिंतीसाठी निधी देताना हात आखडता घेतात असे सांगितले.