
दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील गोरेगाव (पूर्व) न्यू म्हाडा वसाहत आणि दिंडोशीतील स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे क्रीडांगण परिसर व आसपासच्या नागरी वस्तीत सध्या बिबट्यांचा संचार आहे. परिणामी रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या भागात बिबट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त ट्रप कॅमेरे लावण्याची मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पर्यावरण मंत्री गणेश नाईक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मीनाताई ठाकरे क्रीडांगणाच्या आजूबाजूला असलेल्या सोसायट्यांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचा वावर कैद झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे, बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे, परिसरात गस्त वाढवावी, स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन व जनजागृती करण्याचे आदेश वन विभागाला द्यावे अशी विनंती सुनील प्रभू यांनी वन मंत्र्यांकडे केली आहे. हा प्रश्न अत्यंत तातडीची व नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याने यावर तत्काळ उपाययोजना करावेत त्यामुळे नागरिकांच्या मनातील भीती कमी होईल अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे.