
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी भाविकांकडून मोठय़ा प्रमाणात दान दिले जाते. नुकतीच आषाढी एकादशी झाली असून या काळात मोठय़ा प्रमाणात विठुरायाच्या चरणी दान आले. अहिल्यानगर येथील दोन व्यापाऱ्यांनी मिळून तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांचा 87 किलो चांदीचा दरवाजा अर्पण केला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे दान करण्यात आले.
विठ्ठल मंदिरातील चौखंबी दरवाजा चांदीने मढवण्यात आला आहे. अहिल्यानगर येथील विठ्ठलभक्त अतुल अशोक पारख आणि गणेश आदिनाथ आव्हाड यांनी स्वखर्चातून देवाच्या चरणी हा चांदीचा दरवाजा अर्पण केला. अत्यंत सुरेख अशी कलाकुसर केलेला दरवाजा राजस्थानातील उदयपूर येथे तयार करण्यात आला आहे. यासाठी तीन महिने कालावधी लागला.
10 लाख भाविकांनी घेतले दर्शन
पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे 20 लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. यामध्ये सुमारे दहा लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची मंदिर समितीकडे नोंद झाली. 4 लाख 54 हजार भाविकांनी रांगेत उभे राहून देवाचे पदस्पर्श दर्शन घेतले. तर 5 लाख 47 हजार भाविकांनी मुख दर्शन घेतले. अजूनही हजारो भाविक दर्शन घेणार आहेत.