
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील 11 आणि तामीळनाडूतील 1 अशा एकूण 12 किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाले आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे. ”महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वराज्याच्या गर्जनेचे आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले, याचा आम्हाला अभिमान वाटतो”, असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, ”हे गड-किल्ले म्हणजे शौर्य, सामर्थ्य, संस्कृतीचे आणि स्वराज्याच्या दृढ इच्छाशक्तीचे मूर्तिमंत रूप. मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहास यानिमित्ताने संपूर्ण जगासमोर उलगडला जाईल, असा विश्वास वाटतो. आता हा वारसा अतिशय काळजीपूर्वक जपण्याची आणि त्याचे संरक्षण करण्याची राज्य सरकारची जबाबदारी वाढली आहे. ह्यासाठी सरकारने ठोस पावले उचलायला हवीत. आम्ही अशा प्रत्येक पावलावर सरकारला साथ देऊ, असेही त्यांनी या ट्विटमधून सांगितले.