
बिहारमध्ये निवडणूकीपूर्वी वातावरण तापले असून उद्योगपती गोपाल खेमकांनंतर आता एका भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सुरेंद्र केवट असे त्या नेत्याचे नाव असून तो शेखपूरा गावातील भाजपचा पदाधिकारी होता. या घटनेमुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
सुरेंद्र केवट हे त्यांच्या बिहटा सरमेरा महामार्गालगत असलेल्या शेतात पाण्याचा पंप बंद करायला गेले होते. पंप बंद करून घराकडे परतत असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली. त्यानंतर केवट यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलीस सध्या केवट यांच्या हल्लेखोरांचा शोध घेत आहे. त्यासाठी महामार्गावरील सीसीटीव्ही देखील तपासले जात आहेत. या घटनेवरून बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून नितीश कुमार यांच्या सरकावर टीका केली आङे. ”पाटणामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या झाली. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एनडीए सरकारमधील कोणीही काहीही ऐकायला तयार नाहीए. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीविषयी सर्वांना माहित आहे व भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या काय करतायत कुणाला काहीच कळत नाहीए, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.




























































