तिसरी कसोटीही तिसऱ्या दिवशी संपणार, विंडीजला सुखद शेवट करण्याची संधी

वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेला तिसरा कसोटी सामनाही तिसऱयाच दिवशी निकालात निघण्याच्या मार्गावर धावू लागलाय. कसोटीच्या दुसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाच्या जॉश हेझलवूड, पॅट कमिन्स, स्कॉट बोलॅण्ड आणि मिचेल स्टार्क या वेगवान चौकडीने विंडीजचा पहिला डाव 143 धावांतच गुंडाळला आणि 82 धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मात्र त्यानंतर शमार जोसेफ आणि अल्जारी जोसेफ या वेगवान जोडीने ऑस्ट्रेलियाची 6 बाद 99 अशी बिकट अवस्था करत कसोटीला रंगतदार अवस्थेकडे झुकवले आहे. पहिल्या डावातील आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 181 धावांची भर पडली असून दिवसरात्र कसोटीच्या तिसऱया दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर गुंडाळून विंडीजला कसोटी विजयासह तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवट सुखद करण्याची संधी लाभू शकते. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कॅमरुन ग्रीन 42 तर पॅट कमिन्स 4 धावांवर खेळत होता.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने तीन दिवसांतच वेस्ट इंडीजला पराभवाचा धक्का दिला होता. आता तिसरा सामनाही तिसऱया दिवशीच संपण्याची शक्यता आहे. आज कसोटीच्या तिसऱया दिवशी वेस्ट इंडीजचे 9 तर ऑस्ट्रेलियाचे 6 असे एकंदर 15 विकेट पडल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव 225 धावांत संपवल्यानंतर वेस्ट इंडीजच्या डावाला कुणाचाही आधार लाभला नाही. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान चौकडीने ठरावीक अंतराने विंडीज संघाला धक्के देत पुन्हा एकदा त्यांचा डाव 200 पर्यंत पोहोचू दिला नाही.