Monsoon Session 2025 – छाताडावर वार झाले तरी मुंबई लुटू देणार नाही! आदित्य ठाकरे विधानसभेत कडाडले

शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत 293च्या प्रस्तावावर बोलताना सर्वसामान्यांच्या विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. अदानींना मुंबई आंदण देणाऱ्या सरकारला जाब विचारतानाच, छाताडावर वार झाले तरी अदानींना मुंबई लुटू देणार नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे सभागृहात कडाडले. महापालिका निवडणुका, बेस्ट दरवाढ, कायदा-सुव्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणाचे मुद्दे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडतानाच, मुंबईमध्ये 750 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करा, बेस्टची भाडेवाढ रद्द करा, मुंबईकरांवर लादला जाणारा अदानी टॅक्स रद्द करा, अशा मागण्याही त्यांनी केल्या. चड्डी-बनियन गँगवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

गेल्या अडीच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने नगरसेवक नाहीत आणि त्यामुळे स्थानिक पातळीवरील गटर, वॉटर, मीटरचे प्रश्न सुटत नाहीत असे आदित्य ठाकरे म्हणाले. राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांवर प्रशासक नेमून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. नगरसेवकांचे स्वराज्य काढून प्रशासकांचे स्वराज्य आणले गेले आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

लगाकर आग शहर को बादशहा ने ये कहा,
उठा है दिल में आज तमाशे का शौक बहुत…
झुका के सर सभी शहापरस्त बोलते,
हुजूर का शौक सलामत रहे…
शहर और भी बहुत है

असा शेर मारत त्यांनी राज्यातील शहरांची स्थिती अधोरेखित केली.

माझे चॅलेंज आहे… मुंबईतील रस्त्यांचे 6 टक्केही काम पूर्ण झालेले नाही

मुंबईत रस्ता घोटाळा झालाय. पाच लाडक्या कंत्राटदारांना मुंबईत पाच पॅकेट्स बनवून दिले. टेंडर 6080 कोटींचे होते. छोट्या रस्त्यांचे आपण कधीही कॉक्रीटीकरण केलेले नव्हते. कारण त्याखाली युटिलिटीज असतात. कंत्राटदारांना अ‍ॅडव्हान्स मोबिलायझेशन दहा टक्के दिले जे कधीही दिले गेले नव्हते. या टेंडर प्रक्रियेत घोटाळा झाला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. कुलाब्यापासून उत्तर मुंबईपर्यंत पाहिले तर रस्त्यांचे 6 टक्केही काम पूर्ण झालेले नाही… माझे चॅलेंज आहे, असे सांगत या प्रकरणी चौकशीची मागणी त्यांनी केली.

अधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्याने औषधे नाहीत

सरकारने कधीही रुग्णालयांचे अधिष्ठाता, परिचारिका यांची एकत्रित बैठक बोलवून प्रश्नांवर चर्चा केली नाही, अशी टीका केली. मुंबईत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांमध्ये डॉक्टर, कर्मचारी आहेत; पण औषधे नाहीत. कारण ती जबाबदारी असणारा केंद्रीय खरेदी विभाग रस्ते घोटाळ्यात, पुंडय़ा खरेदी करण्यात व्यस्त आहे.

मुंबईचा आर्थिक कणा मोडण्यासाठी पहिला घाव बेस्टवर

बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाही. ग्रॅच्युईटी दिली जात नाही. पेन्शनचा प्रश्न आहे. साडेतीन-चार हजार बसेस होत्या त्या कमी करत चालले आहेत. मुंबईचा आर्थिक कणा मोडण्यासाठी बेस्टवर पहिला घाला कोण घालतोय? बेस्टला मारण्याचे काम कोण करतेय? असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. लाखो लोक रोज बेस्टने प्रवास करतात. बेस्ट बंद झाली तर मुले शाळेत जाणार कशी? मुंबईसाठी दहा हजार इलेक्ट्रीक बसेसची गरज आहे. आता दुपटीने दरवाढ केली गेली. पैसे वाढतील असे वाटले, पण प्रवाशांची संख्या अर्धी झाली आहे. बेस्टचा घाटा झालाय आणि मुंबईला त्रास होतोय, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एमएमआरडीएला साडेपाच हजार कोटी मुंबई महापालिकेतून दिले गेले. सिडकोला पैसे दिले गेले. मग बेस्टला पाच हजार कोटी सरकार देऊ शकत नाही. बेस्टला पुनरुज्जीवित करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

2000 नंतर धारावीत आलेल्यांना अपात्र ठरवताहेत… ते रोहिंग्या आहेत का?

धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली सरकार मुंबई एकट्या अदानीच्या घशात घालायला निघालेय. मग तेथील कोळीवाडा कुठे जाणार, कुंभारवाडा जाणार कुठे, चर्मोद्योग जाणार कुठे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. सन 2000 पर्यंत जे धारावीत राहायचे त्यांनाच पुनर्विकासात घरे दिली जाणार आहेत. इतरांना देवनार डंपिंगच्या कचऱ्याच्या जागेवर पाठवणार. दीडशे वर्षांपासून राहणाऱ्यांना अपात्र ठरवले जातेय आणि अदानीला पात्र ठरवले जाते. ते काय रोहिंग्या आहेत का, असे आदित्य ठाकरे म्हणाले.