प्रवीण गायकवाड शाईफेकीनंतर सोलापुरात मराठा समाजाची बैठक, दोन गटात राडा

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे 13 जुलै रोजी झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेच्या पुढील भूमिका ठरवण्यासाठी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत मराठा समाजाच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला.

बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पंढरपूरहून आलेल्या अॅड. रोहित फावडे यांनी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले यांचा ऐकरी उल्लेख करत प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याच्या कानात अमोलराजे भोसले काय म्हणाले? असा आरोप केला होता. यावरून जन्मजेयराजे आणि अमोलराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी फावडे यांना मारहाण केली, ज्यामुळे बैठकीत प्रचंड गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत फावडे यांना बाहेर काढले, तर भोसले आणि त्यांचे समर्थक निघून गेले. नंतर पोलिसांच्या सुरक्षेत बैठक पुन्हा सुरू झाली.

शाईफेक करणारा दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असल्याचे समोर आले आहे. मराठा सेवा संघाने या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत “विचाराचा लढा विचाराने आणि कायदा हातात घेतल्यास आमच्या भाषेत उत्तर देऊ,” असा इशारा दिला आहे.