
राज्यात राबवण्यात येणाऱया लाडकी बहीण योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बनावट बँक खाती उघडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 104 बनावट बँक खाती उघडण्यात आली असून त्यातून सुमारे 19 लाख 43 हजार रुपयांच्या निधीची सरकारची फसवणूक केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
लाडकी बहीण योजनेच्या नावाने बनावट बँक खाती तयार केल्याच्या संदर्भात भाजपच्या देवयानी फरांदे व अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बनावट बँक खाती तयार करून केलेल्या फसवणुकीच्या संदर्भात मुंबईत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्याशिवाय सातारा, सोलापूर, नांदेडमध्ये प्रत्येक एक गुन्हा दाखल झालेला आहे. जूहू पोलीस स्टेशनने केलेल्या गुह्याच्या तपासात 104 बँक खाती उघडकीस आली आहेत. या गुह्यातील सर्व बँक खाती व बँक खातेधारक खरे आहेत. बँक खातेधारकांना प्रत्येकी एक हजार रुपये देऊन त्यांची बँक खाती आरोपींनी खरेदी केली आहेत. या गुह्यात प्रतीक पटेल फरार असल्याची माहिती दिली आहे.