
बोरिवलीच्या साईबाबा नगर येथील जमीनमालकाला संपूर्ण क्षेत्राचा विकास करण्याकरिता मुंबई महापालिकेने मंजुरी दिली होती. त्यानुसार 1978-80 दरम्यान या 18 भूखंडापैकी 8 भूखंड महापालिकेने घेतले तर 10 विकले गेले, मात्र विक्री झालेल्या 10 भूखंडांशी काहीही संबंध नसलेल्या 8 भूखंडांवरील विकासकामे करायला स्थगिती देण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी उपायुक्त स्तरावरील अधिकाऱयांकडून केली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली.
बोरिवलीतील साईबाबानगर परिसरातील 18 भूखंड हे शिक्षण संस्था, पालिका शाळा, दवाखाना, मैदान तसेच इतर समाजोपयोगी कारणांसाठी राखीव ठेवण्यात आले होते, मात्र विकासकाने हे भूखंड विकून रहिवाशांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी केली जावी, अशी मागणी भाई जगताप यांनी लक्षवेधी मांडून केली. त्याला नगरविकास विभागाच्या वतीने सामंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, या प्रकरणात एका महिला अधिकाऱयाचे नाव आल्याचे नमूद केले. त्या अधिकाऱयावर कारवाई करण्यास कोणतीही अडचण नाही. पदोन्नती होऊन महापालिका उपायुक्त झाल्यानंतरही त्या त्याच जागेवर कार्यरत आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
साईबाबा नगर येथील ज्या पुनर्विकास प्रकल्पांना स्थगिती आहे ती काही कायदेशीर अडचणींमुळेही थांबलेली आहेत, मात्र संबंधित कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अशा प्रकल्पांना परवानगी देण्यासाठी यंत्रणेला आदेश देण्यात येतील, असे सामंत म्हणाले.