
ग्रामीण भागात प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील रस्ते टिकाऊ होण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणारे रस्ते यापुढे सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली.
कोल्हापूर जिह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांबाबत आमदार शिवाजी पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री गोरे यांनी ग्रामीण रस्त्यांची रुंदी सध्या 5, 3 आणि 3.5 मीटर आहे. आवश्यकतेप्रमाणे या रस्त्यांची रुंदी वाढविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच जिल्हा परिषदेकडील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करण्याबाबत प्रस्ताव आल्यास तो तपासून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. ग्रामीण भागात पांदण रस्ते निर्मितीसाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.