…ये बघतो तुझ्यात किती दम आहे, जा जा, गार्ड काढ मग दाखवतो; विधान भवनाबाहेर आव्हाड-पडळकर यांच्यात राडा

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यात आज विधान भवनाच्या गेटवरच राडा झाला. यावेळी दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ केल्याची विधान भवनात चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी आव्हाड यांनी पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचले होते. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांचेही कार्यकर्ते सोशल मीडियावर एकमेकांवर आगपाखड करताना दिसले होते. आज खुद्द आव्हाड आणि पडळकरच आमने-सामने आले आणि त्यांच्यात शिवीगाळ झाली.

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यापासूनच जितेंद्र आव्हाड आणि पडळकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाबाबत टिप्पणी केली होती. त्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी आव्हाड यांनी केली होती. तसेच विधान भवन आवारात पडळकर हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना आव्हाड यांनी पाठीमागून ‘मंगळसूत्र चोर… मंगळसूत्र चोर’ अशा घोषणा देत डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण कोणतीही शिवीगाळ केली नाही असा दावा केला. आपण कार्यकर्त्यांसह विधान भवनाच्या गेटबाहेर उभे असताना पडळकर यांनीच त्यांच्या गाडीचा दरवाजा मुद्दामहून जोराने ढकलल्याने तो मला आणि माझ्या कार्यकर्त्याला लागला, असे आव्हाड म्हणाले.

वादाचा व्हिडीओ व्हायरल

दोघांच्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात पडळकर हे  ‘…दम असेल तर ये, मी एकटाच आहे, तुझ्यासारखी… घेऊन फिरत नाही’ असे बोलताना दिसताहेत, तर आव्हाड यांच्याकडूनही ‘गार्ड बाजूला काढ मग दाखवतो,’ असे प्रत्युत्तर दिले गेल्याचे ऐकू येत आहे.