
राज्यातील मदरशांना परदेशातून फंडिंग होत असल्याची धक्कादायक माहिती आज विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून पुढे आली. नंदुरबारमधील अक्कलपुवा येथील मदरशाला 728 कोटी 60 लाखांपेक्षा जास्त रकमेचा निधी परदेशातून मिळाल्याची धक्कादायक माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हे प्रकरण सभागृहात मांडले. या येमेनच्या काही व्यक्तींनी व्हिसाची मुदत 19 फेब्रुवारी 2016 रोजी संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्य केले याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या व्यक्तींनी आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यासारखी बनावट कागदपत्रे तयार केली. याप्रकरणी 11 फेब्रुवारी 2025 रोजी अक्कलपुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मदरशाचे संस्थापक आणि अध्यक्ष यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या संस्थेने आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आणि शिष्यवृत्ती घोटाळय़ाचा आरोपही कोठे यांनी केला. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, संस्थेची मान्यता रद्द करावी आणि संस्थेने बळकावलेल्या आदिवासींच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
लक्षवेधीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री भोयर यांनी सांगितले की, या मदरशाला विदेशी निधी नियमन कायदा (एफसीआरए) मार्फत 728.61 कोटी रुपये मिळाले. याबाबत पेंद्र सरकारला तक्रार करण्यात आली असून, फॉरेन्सिक आणि कायदेशीर सल्लागार नियुक्त केले आहेत. आदिवासींची जमीन बळकावणे आणि शिष्यवृत्ती घोटाळय़ाच्या आरोपांचीही चौकशी होईल. दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.