बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसीमध्ये समाविष्ट करा, होमिओपॅथी डॉक्टरांचे उपोषण सुरू

होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी या मागणीसाठी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी आजपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले. तत्पूर्वी, राज्यभरातून आलेल्या डॉक्टरांनी जोरदार निदर्शने करत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

राज्यातील अनेक मोठय़ा रुग्णालयांमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी व अतिदक्षता विभागामध्ये आयुष डॉक्टरांकडून सेवा पुरवली जाते. ही सेवा घेताना इंडियन मेडिकल असोसिएशनने कधीही आक्षेप घेतला नाही. मात्र होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्याविरोधात हे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठय़ा संख्येने डॉक्टर सहभागी झाले आहेत.

पावसाची पर्वा न करता शेकडो डॉक्टर आज आझाद मैदानात जमले. आंदोलनकर्त्या डॉक्टरांच्या हातात फलक होते. आरोग्य सेवेतील राजकारण बंद करा… बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसीमध्ये समाविष्ट करा… गावोगावी सेवा आमची तरीही उपेक्षा का आमची… असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही… ‘आम्ही रस्त्यावर हक्कासाठी, सरकार फक्त मतासाठी’ असे फलक घेऊन डॉक्टर रस्त्यावर उतरले होते. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा इशारा होमिओपॅथी परिषदेने दिला आहे.