
प्रचंड खड्ड्यांमुळे मुंबई-नाशिक महामार्ग खड्ड्यात गेला आहे. सर्व्हिस रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते खड्डेमुक्त करावेत यासाठी अनेकदा निवेदन देऊनही जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी काहीच कार्यवाही करीत नसल्याने वाहनचालक आणि नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने संयुक्तपणे पडघा टोलनाक्यावर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले.
पडघा आमणे कल्याण या मार्गावरसुद्धा खड्यांची चाळण झाली आहे. पडघा टोल नाक्यापासून दोन्ही बाजूस असलेल्या सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवावेत आदी मागण्यांसाठी आज आंदोलनकरण्यात आले. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार अभिजित खोल, पोलीस उपअधीक्षक राहुल झालटे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक श्रीकांत ठिगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कुरेशी यांना देण्यात आले.
आंदोलनात उपनेत्या ज्योती ठाकरे, लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे, ग्रामीण जिल्हाप्रमुख विश्वास थळे, जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रकाश भोईर, करसन ठाकरे, महादेव घाटाळ, मनसेचे शैलेश बिडवी, डी. के. म्हात्रे, शैलेश बिडवी, मदन पाटील, विकास जाधव, रवींद्र विशे, गणेश गुळवी भगवान सांबरे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पडघा शहरातून भादाणे गावाकडे जाणान्या भुयारीमार्गामधील खड्डे बुजवावेत. तसेच भुयारी मार्गात सातत्याने साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करावी. शेरेकरपाडा या गावाकडे जाण्याच्या रस्त्यावर अंडरपास तयार करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
आंदोलकांची धास्ती घेऊन सकाळपासूनच टोलनाक्यावरील टोल वसुली बंद ठेवली होती. अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेत तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन महामार्गा दुरुस्तीसंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.