
बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी करणाऱ्या एका प्रवाशाला सीमाशुल्क विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी प्रवाशाच्या ट्रॉली बॅगेतून 1.45 कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. साबिथ मम्मुहाजी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याची पुढील चौकशी सुरू आहे.
बँकॉकहून मुंबईत गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सापळा रचला. साबिथच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या सामानाची तपासणी केली. यावेळी साबिथच्या ट्रॉली बॅगेत गांजाचे सहा पॅकेट्स आढळून आले.
अधिकाऱ्यांनी ही पाकिटे हस्तगत केली. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1.45 कोटी रुपये इतकी आहे. अधिकाऱ्यांनी साबिथवर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले.