
पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सहकार्याने कबड्डी महर्षी बुवा साळवी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात वाघजाई चिपळूण, प्रकाशतात्या बालवडकर, बाबुराव चांदेरे फाऊंडेशन, शाहू संघ, सडोली तर राजमाता जिजाऊ, महात्मा गांधी बाद फेरीत प्रवेश केला आहे.
पुरुष विभागात बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन संघाने उपनगरच्या स्वस्तिक संघावर 49-32 अशी मात करीत बाद फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला दोन्ही संघ 21-21 अशा समान गुणावर होते. मध्यंतरानंतर चांदेरे सोशल फाऊंडेशन संघाच्या सयाजी सुकासेने जबरदस्त खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. वाघजाई क्रीडा मंडळ, चिपळूण संघाने बालवडकर फाऊंडेशन संघावर 44-32 असा विजय मिळविला.
महिला विभागात राजमाता जिजाऊ संघाने महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब संघावर 38-13 अशी एकतर्फी मात करीत सहज विजय मिळविला. मध्यंतराला राजमाता जिजाऊ संघाकडे 21-7 अशी भक्कम होती. राजमाता जिजाऊ संघाच्या निकिता पडवळ व साक्षी गावडे यांनी जबरदस्त खेळ करीत आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. कोमल आवळे व रेखा सावंत यांनी पकडी घेतल्या. महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब संघाच्या पूजा चिंदरकर हिने एकाकी झुंज दिली व स्नेहल चिंदरकर हिने पकडी घेतल्या. धर्मवीर कबड्डी संघाने बारामती स्पोर्ट्स संघावर 34-28 अशी मात केली.