शिक्षक नाही, राक्षस; 23 शाळकरी मुलींचं लैगिक शोषण, व्हिडीओही बनवले, 59 वर्षीय नराधमाला अटक

राजस्थानमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. चित्तोडगड जिल्ह्यातील आवलहेडा गावातील सरकारी शाळेमधील निवृत्तीला आलेल्या शिक्षकाने शाळेतील 23 विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला हा प्रकार एका विद्यार्थिनीने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि शिक्षकाच्या रुपातील राक्षस जगासमोर आला. व्हिडीओ समोर येताच आरोपीला शिक्षकाला निलंबित करण्यात आली असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. शंभुलाल धाकड (वय – 59) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाने 8 ते 16 वर्ष वयोगटातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचा लैंगिक आणि मानसिक छळ केला. गेल्या दोन वर्षांपासून तो विद्यार्थ्यांचे शोषण करत होता. परीक्षेमध्ये नापास करण्याची भीती दाखवून तो विद्यार्थ्यांवर अत्याचार करायचा. तसेच अल्पवयीन विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवायचा. त्याचा हा प्रकार एका विद्यार्थिनीने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि पालकांसह इतर शिक्षकांना दाखवला. यामुळे एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या पालकांनी तात्काळ शाळेमध्ये धाव घेत शिक्षकाला अटक करण्याची मागणी करणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले. यानतंर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आरोपी शिक्षकाचा उल्लेख राक्षस असा केला. शिक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर करून निष्पाप शाळकरी मुलांचा लैंगिक छळ केला आहे. सरकार आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करेल, असा विश्वास मदन दिलावर यांनी दिला.