आकाश दीप, अर्शदीपला दुखापत; धोनीच्या आवडत्या खेळाडूची टीम इंडियात निवड, एका डावात घेतल्यात 10 विकेट्स

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला आणि तिसरा सामना जिंकत इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. चौथा सामना 23 जुलैपासून मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू होईल. हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न हिंदुस्थानचा असणार आहे. मात्र या लढतीपूर्वी हिंदुस्थानला मोठा धक्का बसला असून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आकाश दीप यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या जागी वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याचा संघात स्थान देण्यात आल्याचे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे.

मॅनचेस्टर कसोटीसाठी हिंदुस्थानचा संघ कसून सराव करत आहे. या लढतीत अर्शदीप सिंग याला संघात स्थान मिळण्याची शक्यता होती. मात्र 17 जुलैला सराव करताना त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे तो चौथ्या कसोटीत खेळू शकणार नाही. तसेच आकाश दीप यालाही दुखापत झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हिंदुस्थानने पर्यायी खेळाडू म्हणून 24 वर्षीय अंशुल कंबोज याची निवड केली आहे.

अंशुल कंबोज हरयाणाकडून क्रिकेट खेळतो. त्याने आतापर्यंत प्रथम श्रेणीचे 24 सामने खेळले असून यात त्याने 22.88 च्या सरासरीने 79 विकेट्स घेतल्या आहेत. यासह फलंदाजीतही त्याने 486 धावांचे योगदान दिले आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये यंदाच्या हंगामात त्याने चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केले. त्याने सीएसकेकडून 8 लढतीत 8 विकेट्स घेतल्या होत्या. कर्णधार धोनीचाही तो आवडता खेळाडू होता.

एका डावात 10 विकेट्सचा कारनामा

अंशुल कंबोज याच्या नावावर एक दुर्मिळ विक्रमही आहे. त्याने रणजी स्पर्धेत एका डावात सर्वच्या सर्व 10 विकेट्स घेण्याचा कारनामा केलेला आहे. हरयाणाकडून खेळताना केरळविरुद्ध लढतीत त्याने या कामगिरीची नोंद केली होती. अंशुलआधी बंगालच्या प्रेमांगशु चटर्जी आणि राजस्थानच्या प्रदीप सुंदरम यांनी अशी कामगिरी केली होती.