
हनी ट्रॅपचे खूप मोठे रॅकेट महाराष्ट्रात आहे. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात आजी-माजी मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अनेक बडे अधिकारी अडकले आहेत. ज्या प्रफुल्ल लोढा याचे नाव यामध्ये पुढे आले त्याने मंत्री व अधिकाऱयांकडून तब्बल 200 कोटींची वसुली केल्याचा गंभीर आरोप कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात हनी ट्रॅपमुळे एकच खळबळ उडाली आहे. या ट्रॅपचा केंद्रबिंदू जरी उत्तर महाराष्ट्रात असला तरी त्याचे धागेदोरे मुंबई, ठाणे, पुणे ते मंत्रालयापर्यंत पोहचले आहेत. या ट्रॅपमध्ये राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्री अडकल्याचे बोलले जात आहे. या विषयात रोज नवी माहिती पुढे येत असून विजय वडेट्टीवार यांनी हनी ट्रॅपच्या या प्रकरणात ब्लॅकमेल करून कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढा याच्यावर बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे, परंतु बाकीचे खूप लोक यामध्ये आहेत. त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. यामध्ये आजी-माजी मंत्री, सरकारी अधिकारी असे मिळून जवळपास 50 जण सहभागी आहेत. ते सर्वजण ट्रॅप झाले आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.
झाकलेले चेहरे लवकरच बाहेर येतील
हनी ट्रॅप प्रकरणात ज्या लोढा याला अटक झाली आहे तो कुणाचा कार्यकर्ता आहे हे मी बोलणार नाही. या सगळय़ा प्रकरणाचा लवकरच खुलासा होईल आणि जे झाकलेले चेहरे आहेत ते समोर येतील, असे वडेट्टीवार म्हणाले.
पटोलेंनी दाखवला होता पेन ड्राईव्ह
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र झाल्याचा आरोप केला होता. यासंदर्भातील एक पेन ड्राईव्हही सभागृहात दाखवला होता. विधानसभा अध्यक्षांनी सरकारला निवेदन करण्यास सांगितले होते. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ना हनी आहे, ना ट्रॅप असे सांगत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
एका कुत्र्याच्या मागे 100 कुत्रे लागतात तशी महाजनांची अवस्था होईल
जोपर्यंत देवा भाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजन याची किंमत आहे, एकदा त्यांनी डोक्यावरचा हात काढला की गल्लीमध्ये एक कुत्र्याच्या मागे जशी 100 कुत्रे लागतात तशी महाजनांची अवस्था होणार आहे, असे खडसे म्हणाले.
हनी ट्रॅपच्या प्रकरणांमध्ये कोण कोण आहे त्याचे मूळ मला शोधायचे आहे. यातला एक जण आपल्या विभागातला आहेच मी त्यापर्यंत लवकरच पोहचेन आणि हा विषय शेवटपर्यंत नक्कीच जाईल, असा विश्वाससुद्धा खडसे यांनी व्यक्त केला.
तोंड उघडू नये म्हणून लोढा कोठडीत!
प्रफुल्ल लोढाकडे असलेले मटेरियल त्याने इतरांना देऊ नये, त्याने तोंड उघडू नये म्हणूनच त्याला सतत पोलीस कोठडीत ठेवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार एखनाथ खडसे यांनी केला. हा लोढा गिरीश महाजन यांच्या बंगल्यातच सातत्याने राहायचा. मंत्री असतानाही तो त्यांच्यासोबत असायचा, असे खडसे म्हणाले.