Ratnagiri News – छप्पर फाडके निधी देणाऱ्यांचेच छप्पर फाटले, जिल्हा नियोजनच्या कार्यालयात पाणी थेंब थेंब गळं

संपूर्ण जिल्ह्याला विकासकामासाठी करोडो रूपयांचे निधी वितरित करणाऱ्या रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयाची अवस्था दयनीय झाली आहे. दिव्या खाली अंधार अशी गत जिल्हा नियोजन समितीची झाली असून कार्यालयात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची गळती होत आहे.दररोज लेखाधिकाऱ्यांच्या दालनात तीन-चार बादल्या लावाव्या लागत आहेत. छप्पर फाडके निधी देणाऱ्यांचे आभाळ फाटलंय, अशी अवस्था झाली आहे.

जिल्हा नियोजन समितीचे कार्यालय काही वर्षांपूर्वी टकाटक करण्यात आले होते. दरवर्षी साडेतीनशे-चारशे कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडून संपूर्ण जिल्ह्याला विकासकामासाठी निधी वितरीत करण्याचे काम जिल्हा नियोजन समिती करते. सध्या मात्र या कार्यालयाची अवस्था दयनीय झाली आहे. लेखाधिकारी यांच्या दालनातील छप्पराचे पीओपी उध्वस्त झाले आहे. इमारतीला गळती असल्याने पावसाच्या पाण्याच्या धारा लागत आहेत. लेखाधिकाऱ्यांच्या दालनात दररोज तीन – चार बादल्या लावाव्या लागत आहेत.जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या दालनाची अवस्थाही बिकट आहे. पाऊस सुरू झाला की, पाझर तलावाप्रमाणे त्यांच्या दालनात पाणी पसरते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. जुन्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील काही भाग तोडण्यात आला आहे. त्यामुळेही इमारतीला हादरे बसले आहेत.नवीन इमारत होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीला प्रतीक्षा करावी लागणार आहे.