
बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) नेत्या राबडी देवी यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) यांच्यावर तेजस्वी यांच्या हत्येचा कात रचल्याचा थेट आरोप केला आहे. राबडी देवी यांनी म्हटले की, तेजस्वी यांना आतापर्यंत चार वेळा मारण्याचा प्रयत्न झाला आहे.
बिहार विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादम्यान विशेष गहन पुनरीक्षण (एसआयआर) म्हणजेच मतदार यादीच्या फेरतपासणीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी तीव्र आंदोलन केले आहे. यातच राबडी देवी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे की, “आम्ही निश्चितपणे विरोध करू, कारण हा बिहारच्या जनतेचा प्रश्न आहे. जे 4 कोटी लोक रोजगारासाठी बिहारबाहेर गेले आहेत, त्यांचे काय? गेल्या पाच दिवसांपासून आम्ही यावर आंदोलन करत आहोत. राज्य सरकारने यावर उत्तर द्यावे.”
राबडी देवी यांनी एसआयआरच्या नावाखाली गरीब, दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाच्या मतदारांना मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. त्यांनी याला बिहारमधील लोकशाही कमकुवत करण्याचा कट म्हटले आहे.
तेजस्वी यांच्या जीवाला धोका
यावेळी बोलता राबडी देवी म्हणाल्या की, तेजस्वी यादव यांच्या हत्येची कट रचला जात आहे. त्या म्हणाल्या की, “तेजस्वी यांना मारण्याचे आतापर्यंत चार प्रयत्न झाले आहेत.आम्हाला माहिती आहे की यामागे कोण आहे. भाजप आणि जेडीयू यांच्याकडून तेजस्वी यांच्या जीवाला धोका आहे.”