
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या ISO 9001:2015 प्रमाणित प्राथमिक विद्यालय, सती चिंचघरी (ता. चिपळूण) येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा अत्यंत हृदयस्पर्शी आदर्श घालून दिला आहे. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या 1000 राख्या भारतीय जवानांना पाठवून देशसेवकांना मनापासूनची मानवंदना दिली.
या उपक्रमाचे हे सलग सहावे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेच्या मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षिका ज्योती चाळके यांच्या प्रमुख सहभागातून शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या तयार केल्या. यासोबत विद्यार्थिनींच्या हस्ताक्षरातील एक पत्र प्रत्येक पाकिटात समाविष्ट करण्यात आले.
या राख्या भारतीय सीमेवरील जवानांना पाठवण्यासाठी माजी सैनिक हवालदार प्रविण भुरण व हवालदार संभाजी चव्हाण यांच्या हस्ते या पाकिटांचे प्रातिनिधिक रूपाने पूजन करून पाठवणी करण्यात आली. या वेळी भुरण व चव्हाण यांनी आपले सैनिकी अनुभव सांगत देशसेवेचे महत्व विद्यार्थ्यांपुढे मांडले. सैनिकांचे जीवन, त्यांचा त्याग, आणि देशप्रेम याविषयी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमादरम्यान “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” या घोषणांनी सभागृह देशभक्तीने भारावून गेले. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, वृषाली राणे, अर्चना देशमुख, रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण तसेच शिक्षकेतर कर्मचारी विनोद उदेग, एकनाथ चाळके, विजया मौजे, समीर इंगावले यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या या राख्या जेव्हा जवानांच्या हाती पोहचतात, तेव्हा ते फोन किंवा पत्राद्वारे समाधान व्यक्त करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीपासून दूर असलेल्या जवानांसाठी या राख्या एक भावनिक आधार ठरतात.