दहशतवादाला काँग्रेस आणि नेहरूच जबाबदार, अमित शहांनी बडवले जुनेच तुणतुणे

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या वादळी चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जुनेच तुणतुणे बडवले. फाळणी, पाकिस्तान आणि दहशतवादाला काँग्रेस आणि देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूच जबाबदार आहेत, असा दावा त्यांनी केला.

पाकव्याप्त कश्मीरचे जे अस्तित्व आहे ते जवाहरलाल नेहरू यांच्या युद्धविरामाच्या निर्णयामुळेच. पाकव्याप्त कश्मीरला जवाहरलाल नेहरूच जबाबदार आहेत, असा आरोप अमित शहा यांनी केला.

सरदार पटेलांनी 1960 मध्ये विरोध कसा केला?

1960 साली कश्मीरात सैन्य निर्णायक वळणावर असताना सरदार पटेलांचे म्हणणे नेहरूंनी ऐकले नाही आणि युद्धविराम केला, असे अमित शहा बोलले. त्यावरून पटेल यांचे निधन 1950 मध्ये झाले मग ते 1960 मध्ये विरोध कसा करतील, असा सवाल काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला.

मतदार ओळखपत्र, चॉकलेटवरून दहशतवाद्यांना ओळखले

पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱया तीन दहशतवाद्यांना पंठस्नान घालण्यात आले. जम्मू-कश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराने ही कारवाई केली. दहशतवाद्यांकडून तीन रायफल जप्त करण्यात आल्या. सुलेमान, जिब्रान आणि अफझल अशी दहशतवाद्यांची नावे असल्याचा दावा अमित शहा यांनी केला. दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील मतदार ओळखपत्र आणि तेथील बनावटीच्या चॉकलेटवरून दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आल्याचे शहा म्हणाले.