
झटपट पैसा कमावण्यासाठी आयआरबी टोलनाक्यावरील सुरक्षारक्षकाने बोगस टोल फ्री व्हीआयपी पासची विक्री केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ओंकार महाडिक असे या सुरक्षारक्षकाचे नाव असून तो कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता. दरम्यान, त्याने टोलनाक्यावरून प्रवास करणाऱ्या महागड्या कारमालक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत ओळख करून या व्हीआयपी पासची विक्री केली. मात्र टोलनाक्यावर व्हीआयपी पासधारकांची संख्या झपाट्याने वाढल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला.
खालापूरच्या सावरोली मुंबई-पुणे हायवेचा आयआरबी टोलनाका असून त्या ठिकाणी कंपनी प्रशासनाने स्थानिकांना नोकऱ्या दिल्या आहेत. सुरक्षारक्षक ओंकार हादेखील स्थानिक रहिवासी असून त्याचे वडील आयआरबी टोलनाक्यावर कामाला होते. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर कंपनीने त्याची कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक केली होती. यावेळी त्याने रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथून पुण्याला ये-जा करणाऱ्या वाहनमालकांसोबत ओळख केली. त्यानंतर आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा बोगस टोल फ्री व्हीआयपी पास बनवून त्याची विक्री केली. मात्र अचानक टोलनाक्यावर व्हीआयपी टोल पास वापरणाऱ्या गाड्यांची संख्या वाढल्याचे कंपनीचे अधिकारी जयवंत देसले यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी केलेल्या चौकशीनंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला.
अधिकाऱ्यांशी मिलिभगत असल्याचा संशय
आयआरबी कंपनीकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सुरक्षारक्षकावर कारवाई करण्याचे आदेश खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना दिले. त्यानुसार पोलिसांनी ओंकारविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याप्रकरणी न्यायालयाने त्याला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी काही बड्या अधिकाऱ्यांशी मिलिभगत असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.