
शहा सेनेचे मंत्री दादा भुसे यांचे भाचेजावई आणि वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या नाशिक जिह्यातील सटाणा व पाथर्डीतील मालमत्तेची ईडीने झाडाझडती घेतली. सटाण्यात तसेच पाथर्डीत पवार यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेले फार्महाऊस, शेतजमीन आणि प्लॉट्सची ईडीच्या पथकाने पाहणी करत त्या तपशिलाची नोंद केली.
ईडीने वसईतील अनिलकुमार पवार यांच्या घरातून काही संशयास्पद कागदपत्रे आणि एक कोटी 33 लाखांची रोकड हस्तगत केली होती. या धाडीत पवार यांच्या राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचा तपशील समोर आला.
n पवारांच्या मालमत्तेत नाशिकच्या सटाण्यात शेतजमीन, फार्म हाऊस अंदाजे 16 लाख रुपये किंमत, फ्लॅट तीस लाख रुपये किंमत, बागडांच्या आरोहीमध्ये तीन ठिकाणी प्लॉट- एक कोटी 27 लाख रुपये किमतीचे, पुण्यातील शिवाजीनगर परिसरात आलिशान फ्लॅट एक कोटी 94 लाख रुपये किमतीचा असल्याचे कळते.
n पवार यांनी नाशिक शहरातील पाथर्डी शिवार येथील पांडवलेणी डोंगरामागे 444 चौरस मीटर प्लॉट गिफ्ट डीड (बक्षीसपत्र) आईच्या नावे घेतला आहे. या प्लॉटची ईडी पथकाने पाहणी केली. यासंदर्भात कागदपत्रांची आणि व्यवहारांची बारकाईने तपासणी ईडीकडून केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

























































