तेरा पिछा ना मै छोडूंगा, ‘डोलांड’चे भूत मानगुटीवरून उतरता उतरेना; हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवले, ट्रम्पना नोबेल द्या! व्हाईट हाऊसची मागणी

मित्र ‘डोलांड’चे भूत मानगुटीवर बसले आहे आणि ते काही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पिच्छा सोडायला तयार नाही. आता तर व्हाईट हाऊसनेच पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष ट्रम्प यांनीच हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवले आहे. त्यांना शांततेचा नोबेल मिळायला हवा, अशी मागणी केली आहे.

‘जगातील कोणत्याही नेत्याने युद्ध थांबवायला सांगितले नाही,’ असे पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सांगितले, मात्र हे युद्ध मीच थांबवले, असे त्यानंतरही ट्रम्प यांनी ठासून सांगितले. आतापर्यंत तब्बल तीस वेळा त्यांनी हा दावा केला आहे. मात्र मोदी ट्रम्प यांचे साधे नाव घ्यायलाही तयार नाहीत. आता तर थेट व्हाईट हाऊसनेच ट्रम्प यांची मध्यस्थी अधोरेखित केल्याने मोदी सरकारची गोची झाली आहे.

ट्रम्प यांनी हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केली. गेल्या सहा महिन्यांत ट्रम्प यांनी जगातील अशी सहा मोठी युद्धे थांबवली. त्यामुळे ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्याची हीच वेळ असल्याचे व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

हिंदुस्थानातील सहा कंपन्यांवर बंदी

इराणकडून तेल आणि पेट्रोकेमिकल पदार्थ खरेदी करणाऱ्या 6 हिंदुस्थानी पंपन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. कांचन पॉलिमर्स, अल्केमिल सोल्युशन्स, रमनिकलाल एस. गोसालिया अॅण्ड कंपनी, ज्युपिटर डाई केम, ग्लोबल इंडस्ट्रियल केमिकल्स आणि पर्सिस्टंट पेट्रोकेम अशी कंपन्यांची नावे आहेत.

पाकिस्तान, बांगलादेशला कमी टॅरिफ

दहशतवादाला खतपाणी घालून हिंदुस्थानात कारवाया करणारा पाकिस्तानला मात्र अमेरिकेने गोंजारले आहे. पाकिस्तानवर फक्त 19 टक्के टॅरिफ लावले आहे तर बांगलादेशवर 20 टक्के कर लावला आहे.

ट्रम्प म्हणतात, ही युद्धे थांबवली

  • हिंदुस्थान-पाकिस्तान
  • इराण-इस्रायल
  • रवांडा-कांगो
  • सर्बिया-कोसोवो
  • थायलंड-पंबोडिया
  • इजिप्त-इथिओपिया

पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी गेल्या सहा महिन्यांत दर महिन्याला सरासरी एक युद्ध थांबवले किंवा शांतता करार घडवून आणला आहे. त्यामुळे ते शांततेच्या नोबेलसाठी पात्र आहेत, असे व्हाईट हाऊसने नमूद केले.

टॅरिफ आता 7 ऑगस्टपासून

ट्रम्प यांनी हिंदुस्थानातून आयात केल्या जाणाऱया मालावर 25 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय सात दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. 1 ऑगस्टपासून हा कर लादला जाणार होता, मात्र आता 7 ऑगस्टपासून नवीन टॅरिफ लागू केले जाणार आहे. 69 देशांवर नवा कर लादला जाणार आहे.