
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यामुळे दौंड तालुक्यातील यवत गावात आज दुपारी जातीय दंग्याचा भडका उडाला. जाळपोळ आणि तुफान दगडफेक झाली. दगडफेकीमुळे परिसरातील आठवडा बाजारही रद्द करण्यात आला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. दरम्यान, परिसरात शांतता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.
यवतमध्ये निळकंठेश्वर महाराज मंदिर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची 26 जुलै रोजी विटंबना झाली होती. तेव्हापासून गावात तणावाचे वातावरण असून तणाव निर्माण झाला असून आज एका आक्षेपार्ह पोस्टने आगीत तेल ओतण्याचे काम केले.
आक्षेपार्ह पोस्टनंतर…
एका मुस्लिम तरुणाने व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे आक्षेपार्ह पोस्ट केली. त्याची माहिती यवत पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र संबंधित पोस्ट व्हायरल झाल्यानंतर यवत गावातील दोन गटांत संघर्ष निर्माण झाला.
पुतळ्याची विटंबना; दोघांना बेड्या
शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी पोलिसांनी यवतमधील अमिन सय्यद या 32 वर्षीय तरुणाला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. यानंतर याच प्रकरणात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱयालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोन दिवस जमावबंदी
दोन गटांत झालेल्या दगडफेकीनंतर जमावाकडून अनेक वाहनेही पेटवण्यात आली. त्यामुळे यवतमध्ये दोन दिवस जमावबंदी लागू करण्यात आली असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.