
दुबईत झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हिंदुस्थानचे नाव उंचावणारी कामगिरी मुंबईच्या खेळाडूंनी केलीय. त्यांच्या कामगिरीने असंख्य खेळाडूंना स्फूर्ती मिळालीय. त्यांनी असेच सोनेरी दिवस शरीरसौष्ठवाला दाखवावेत, अशा शुभेच्छा देत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आणि त्यांचे कौतुक करत जाहीर सत्कारही केला.
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेच्या वतीने लोखंडवाला येथील सेलिब्रेशन क्लबमध्ये दुबईच्या अजमान येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या रेखा शिंदे व ज्युनिअर शरीरसौष्ठवपटू समर्थ कोचले यांनी सुवर्णपदक पटकावले होते तर हरमीत सिंगने रुपेरी यश मिळवले होते. तसेच संदीप सावळे आणि मनोज बोचरे यांनी कांस्यपदकाचा मान मिळवला होता. या पाचही विजेत्यांचा जाहीर सत्कार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, आमदार हारून खान, मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, सचिव राजेश सावंत, वर्सोवा विधानसभा संघटक शैलेश फणसे, उपविभागप्रमुख राजेश शेटे उपस्थित होते.
खानविलकरांनी दिले होते बळ
संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी खेळ आणि खेळाडूप्रति कृतज्ञता व्यक्त करताना हरमीत सिंग, संदीप सावळे आणि रेखा शिंदे या तिघांचा स्पर्धेचा पूर्ण खर्च उचलला होता. त्याच्या सहकार्याच्या बळाने मनोधैर्य उंचावलेल्या तिन्ही खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत खानविलकरांनी दिलेल्या संधीचे त्यांनी पदकात रूपांतर केले. खानविलकरांच्या लाखमोलाच्या सहकार्यानंतर अन्यही संघटकांनी उदयोन्मुख आणि गरजू खेळाडूंना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.