साहित्य जगत- काही स्वैर नोंदी

>> रविप्रकाश कुलकर्णी

साहित्य जगतच्या वाचकांना अनेक गोष्टी सांगायच्या आहेत. विषयदेखील डोळ्यासमोर आहेत. पण कुठेतरी गाडं अडतंय, पण ते नेमकं काय हे सांगता येत नाही. तर आहे हे असं आहे. मग काय करावे? म्हणूनच या काही स्वैर नोंदी…

अशा वेळी सुप्रसिद्ध इंग्रजी सदर लेखक बीझी बी याने सांगितलेला सल्ला माझ्या कामी येतो. तो म्हणतो, जे सांगावंसं वाटतं त्याचा पुनरुच्चार करून ठेवावा आणि नंतर जमेल तसं लिहावं किंवा न लिहावं, मात्र हे स्वैरविचार आहेत, असं सांगायला विसरू नये.

…तर त्यालाच स्मरून सुरुवात करतोय हो!

मित्राचा फोन आला की, सूर्यकांत खांडेकर आणि वि. स. खांडेकर यांचा काही नातेसंबंध आहे का? हे दोघेही कोल्हापूरचे. पण असा प्रश्न कधी मनात आला नाही हे खरंच. मित्राच्या मनात तरी हा प्रश्न कसा आला असेल? झालं, सूर्यकांत खांडेकर हा विषय मनात झिरपू लागला. सूर्यकांत खांडेकर म्हटलं की ओठावर त्यांचं गाणं येतं..

सहज सख्या एकदाच येईल सांजवेळी 

वाट तुझी पाहीन त्या आम्रतरुखाली

श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं विसरता येत नाही. आणि हो, त्याचबरोबर ‘त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का’ हे गाणं पाठोपाठ आलंच. मग आठवलं, शाहीर पिलाजीराव सरनाईक हे सूर्यकांत खांडेकरांचे मामा. त्यांच्या प्रेरणेतून खांडेकरांनी मराठी पोवाडा या विषयावर पीएच.डी. केली. त्यांच्या पत्नीने ‘सावली प्रेमाची’ हे आत्मचरित्र लिहिलं आहे. मात्र ते शोध घेऊनही मला वाचायला मिळालं नाही. ते मला कसं मिळेल?

अधिक शोध घेता कळलं सूर्यकांत खांडेकरांची सध्या जन्मशताब्दी सुरू आहे. (जन्म 2 एप्रिल 1926, मृत्यू 15 जून 1979). मित्राला हे कळवलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्याच्याकडे ते आत्मचरित्र होतं, पण ते कुणीतरी नेलं ते परत आलंच नाही. तेव्हा आता काय करावे? ही समस्या जुनीच आणि प्रत्येक ग्रंथसंग्राहकाच्या वाटय़ाला येणारी… अटळच.

मध्यंतरी समीर परांजपे यांनी बुक क्लब व्हाट्सअॅपवर एक कात्रण पाठवलं होतं. ते जाहीर पत्र आहे ‘प्रबोधन’ साप्ताहिकात प्रसिद्ध झालेलं. ते असं-

‘माझ्या मित्रांना विनंती.

माझ्या ग्रंथसंग्रहातील महत्त्वाचे पुष्कळ ग्रंथ व पुस्तके आपण वाचण्यासाठी नेली आहेत. दोन-दोन, तीन-तीन वर्षे झाली, पण आपणाकडून ती परत आलेली नाहीत. कोणाकडे कोणती पुस्तके दिली याचे आता मला स्मरण नाही किंवा त्यांची नोंदवही ही आता सापडत नाही. आता एकच मार्ग उरला आणि तो या जाहीर विनंतीचा. मी ज्यांना ज्यांना सद्हेतूपूर्वक माझी पुस्तके वाचण्यास दिली, त्यांनी त्यांनी त्या हेतूचा तरी मान राखण्यासाठी आपापली कपाटे तपासून माझी पुस्तके मला प्रामाणिकपणे परत करावी, अशी हात जोडून प्रार्थना आहे. पुस्तके दादर येथे श्री. कृष्णाराव गुप्ते (20, मिरांडा चाळ) यांच्या हवाली करून मला पत्राने कळवावे.

पुणे शहर.

15-7-26 केशव सीताराम ठाकरे’

तात्पर्य ः हे दुःख फार पुरातन आहे. आता प्रश्न असा आहे की प्रबोधनकारांच्या या पत्राला प्रतिसाद मिळाला का? याचे उत्तर कोण देईल? समीर परांजपे यांनी मागे भुंगा लावून दिलाय हे खरे. पण प्रत्येक ग्रंथ संग्राहकाच्या भाळी हे अटळ असतंच. ग्रंथ संग्राहकांच्या आठवणी नेहमीच येत असतात. त्यात अशा चटक्यांच्या गोष्टी का बरं नसतात?

जन्मलेल्याची जन्मशताब्दी होतेच. पण ती साजरी होतेच असं नाही. ती कुणीतरी करावी लागते.

अलीकडच्या काळात गोविंदराव तळवलकरांच्या जन्मशताब्दीचे वेगळेपण सांगायला हवे. 23 जुलै 2025 ः गोविंद तळवलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची अखेर साधना प्रकाशनने त्यांच्या दोन पुस्तकांच्या नव्या आवृत्या काढून साजरी केली. ही पुस्तके म्हणजे ‘वाचता वाचता’ आणि दुसरे म्हणजे तळवलकरांच्या कन्या डॉक्टर निरुपमा व सुषमा तळवलकर यांनी लिहिलेले ‘ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर’ हे चरित्र. आपल्याकडे मुली आपल्या वडिलांचे चरित्र क्वचितच लिहिताना दिसतात. अशा पार्श्वभूमीवर हे चरित्र महत्त्वाचे आहे. तसंच मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे तळवलकरांची चार दुर्मिळ पुस्तके पुनःमुद्रित झाली आहेत. ती म्हणजे परिक्रमा, लाल गुलाब, विराट ज्ञानी न्यायमूर्ती रानडे, व्यक्ती आणि वाङ्मय.

अलीकडच्या काळात एखाद्या संपादकाच्या जन्मशताब्दीची सांगता अशी झालेली असे हे एकमेव उदाहरण. यावरून आठवलं तळवलकरांच्या ‘अभिजात’ लेखसंग्रहात तीन-चार लेख अरुण टिकेकर यांचे आहेत. त्याबाबत दोघांची पत्रापत्री आणि अर्थात वादावादी झाली. वृत्तपत्रीय आयुष्यात असंही घडतं हे कळण्यासाठी त्याला ऐतिहासिक मोल आहे. हा पत्र व्यवहार त्यांचे कुटुंबीय प्रकाशित करतील काय?

तर आहे हे असं आहे. कुठून सुरुवात केली आणि कुठे पोहचलो. असो.