
भाजपच्या नवी मुंबईतील आमदार मंदा मात्रे यांनी विशेष प्रयत्न करून सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलसाठी मिळवलेल्या भूखंडावर वनविभागाने कांदळवन दाखवण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू केला आहे. त्यासाठी येत्या सोमवारी रुग्णालयाच्या भूखंडाची स्थळ पाहणी ठेवण्यात आली असून या पाहणीसाठी पालिका आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना वनविभागाने केल्या आहेत. वनविभागाच्या या हालचालीमुळे नवी मुंबईत ताई आणि दादा यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या दोन आमदारांमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे पदाधिकारी हैराण झाले आहेत.
नवी मुंबईत सुपर स्पेशलिटी शासकीय रुग्णालय उभारावी यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा मात्रे यांनी सिडकोकडून भूखंड मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार सिडकोने बेलापूर येथील सेक्टर 15 मधील भूखंड रुग्णालयासाठी देण्याचे ठरवले आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेचा आधार घेत याच भूखंडावर कांदळवन दाखवण्यासाठी वनविभागाने जीवाचा आटापिटा सुरू केला आहे. या भूखंडात वनविभागाकडून होत असलेल्या हस्तक्षेपामुळे वनमंत्री गणेश नाईक आणि बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
के. एम. एल. फाईल मागवून घेतली
या भूखंडाची स्थिती जाणून घेण्यासाठी वनविभागाने सिडकोकडून के. एम. एल. फाईल मागवून घेतली आहे. त्यानुसार चार 4 जुलै रोजी रुग्णालयाच्या भूखंडाची स्थळ पाहणी करण्यात आली. त्याप्रसंगी संबंधित प्राधिकरणाने दाखल केलेली के. एम. एल. फाईल आरक्षण रद्द दर्शवणारी असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.





























































