
चित्रपट क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मल्याळम सिनेसृष्टीतील 52 वर्षीय अभिनेता कलाभवन नवस याचा एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अभिनेता कलाभवन नवस हा त्याच्या एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी कोचीच्या चोट्टनिक्कारा येथील एका हॉटेलमध्ये थांबला होता. यावेळी त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्याने याबाबत माहिती दिल्याने ही घटना उघडकीस आली.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कलाभवन त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी कोचीतील एका हॉटेलमध्ये थांबला होता. 1 ऑगस्ट रोजी ते या हॉटेलमधून चेक आऊट करणार होता. मात्र, चेक आऊटची वेळ निघून गेली तरीही कलाभवन रिसेप्शनवर आला नव्हता. त्यामुळे हॉटेल कर्मचारी ताबडतोब चौकशीसाठी त्यांच्या रुमवर गेले. त्यावेळी अभिनेता कलाभवन हॉटेल रुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आला.
दरम्यान, कलाभवनला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कलाभवन नवसला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, कलाभवन नवसच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी शोक व्यक्त केला आहे.