
कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तिणीला अंबानी यांच्या मालकीच्या वनतारा अभयारण्यात पाठवण्यात आल्यामुळे जैन समाजात प्रचंड नाराजी आहे. याच मुद्दय़ावरून जैन मुनी आचार्य गुणधरनंदीजी महाराजांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला आहे. ‘देवेंद्र फडणवीस हे अंबानींच्या मांडीवर जाऊन बसले आहेत,’ असा घणाघात गुणधरनंदीजी यांनी केला.
आठ दिवस झाले. फडणवीसांनी मठात साधा पह्न केला नाही. आमचे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. असला कसला हा मुख्यमंत्री आहे. कोणत्या बिळात जाऊन लपला आहे? निवडणुकीच्या वेळी हात जोडता आणि आता वेळ नाही. धिक्कार आहे तुमच्या जीवनावर. जो समाजाचे अश्रू पुसू शकत नाही त्या मुख्यमंत्र्यांचे सरकार जाणार, असा संताप जैन मुनींनी व्यक्त केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.