डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाने मुंबईकर बेजार; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णांची संख्या दुप्पट

डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या पावसाळी आजारांमुळे मुंबईकर अक्षरशः बेजार झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या पावसाळ्यात रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याचे चित्र आहे.  मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र मोठय़ा प्रमाणावर साचून राहिलेले पावसाचे पाणी, चिखल आणि गाळ यामुळे डासांची मोठय़ा प्रमाणावर उत्पत्ती झाली असून डासनिर्मूलनात मुंबई महानगरपालिका सपशेल अपयशी ठरल्याचेच त्यामुळे समोर आले आहे.

मुंबईत अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱया पाइपलाइन गळक्या आहेत. पाणीगळतीमुळे आणि मुसळधार पावसात साचलेल्या पाण्यामुळे अनेक भागांत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी गॅस्ट्रो आणि काविळीचे रुग्ण वाढल्याचेही चित्र आहे. डेंग्यू, मलेरिया आणि व्हायरल तापाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर वाढल्यामुळे सायन, भाभा, केईएम, जेजे, सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. काही रुग्णालयांमध्ये तर रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी बेडच उपलब्ध नाहीत. सायनसारख्या रुग्णालयात तर एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे चित्र आहे.

आजार                        जानेवारी ते           2025

                               जुलै 2024

मलेरिया                     2852                         4151

डेंग्यू                         966                           1,160

चिकुनगुनिया                 46                             265

लेप्टोस्पायरेसिस             281                           244

गॅस्ट्रो                       5439                         5182

हिपॅटायटीस ए,ई          493                           693

कोविड  19             1646                         1094

घरोघरी जाऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना

पालिकेमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. पालिका रुग्णालयांच्या माध्यमातून नागरिकांना आठवडय़ातून एकदा डॉक्सी गोळ्या देण्यात येत आहेत. असे असले तरीही डेग्यू, मलेरिया आणि व्हायरल तापाच्या रुग्णांची रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये गर्दी होत असल्याचे दिसत आहे.

तत्काळ उपचार घ्या, ताप अंगावर काढू नका

गॅस्ट्रो आणि काविळीचे रुग्णही वाढल्यामुळे पाणी उकळून प्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लेप्टोस्पायरेसिसचेही प्रमाण मोठे आहे. त्यामुळे जखम झाली असेल तर साचलेल्या पाण्यातून जाणे टाळा. तसेच अंगदुखी, कणकण, थंडी भरून ताप येणे, सांधेदुखी, मळमळ, उलटय़ा, डोकेदुखी, भूक मंदावणे, घसा कोरडा पडणे अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या, असे आवाहनही करण्यात आले आहे