
महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील भट्टारक जिनसेन मठातील माधुरी ऊर्फ महादेवी ही हत्तीण गुजरातच्या ‘वनतारा’कडून परत मिळावी, यासाठी आज पहाटे हजारो ग्रामस्थ आणि भक्तांनी नांदणीपासून मूक मोर्चा काढला.
तब्बल 45 किमीची पदयात्रा करून सायंकाळी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चाच्या वतीने महादेवी परत मिळावी, यासाठी थेट राष्ट्रपती यांच्या नावे दयेचा अर्ज करण्यात आला.सर्वपक्षीय दहा महिलांच्या शिष्टमंडळाद्वारे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
‘पेटा’च्या तक्रारीनंतर न्यायालयीन निर्णयानंतर नांदणी मठातील महादेवी हत्तीण गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्यात आली. त्यामुळे नांदणीसह पंचक्रोशीतील हजारो नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. कोल्हापूरसह परिसरातील लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विविध संघटनांनी ‘महादेवी’ला पुन्हा मठात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर श्री 1008 भगवान महावीर जयंती उत्सव समिती, इचलकरंजी आणि समस्त जैन बांधवांच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पहाटे नांदणी ते कोल्हापूर मूक पदयात्रेस सुरुवात झाली. तब्बल 45 कि.मी.अंतर पायी चालत सायंकाळी पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली.
महामहिम राष्ट्रपती यांना सादर केलेल्या दयेच्या अर्जामध्ये महाराष्ट्र व कर्नाटकातील आराध्य दैवत असलेल्या जिनसेन मठ नांदणी (ता. शिरोळ) येथील मठाची माधुरी ऊर्फ महादेवी ही हत्तीण परत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील 743 गावांच्या जिनसेन मठ नांदणी यांच्या महादेवी हत्तीणीला पेटा व वनतारा यांनी चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीररीत्या ‘वनतारा’ येथे पाठविले आहे.
गेल्या जवळपास 450 वर्षांपासून या मठाच्या माध्यमातून हत्ती पाळले जात आहेत. सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या महादेवीचे (माधुरी) गेली 33 वर्षे या मठामध्ये संगोपन व पालनपोषण केले गेले आहे. महादेवी ही गळ्यातील ताईत बनली आहे.दैनंदिन मठाशेजारी गावात फेरफटका असायचा. महादेवीला घेऊन जाताना शासन तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून दिलेले पालनपोषणाचे तसेच वैद्यकीय अहवाल हे सकारात्मक होते. ‘पेटा’ने व ‘वनतारा’ने या हत्तीणीच्या अहवालाबाबत चुकीची माहिती दिली आहे. जर ‘माधुरी’ आजारी होती, तर सलग 48 तास प्रवास करून ती वनतारा, जामनगर येथे कोणत्या नियमान्वये घेऊन गेले, असा सवाल करण्यात आला आहे. वनतारा येथे घेऊन जाण्याआधी गावातून काढलेल्या मिरवणुकीत ‘महादेवी’च्या डोळ्यांतूनही अश्रू ढळत होते.
या घटनेमुळे जनभावना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने एखाद्या अपराध्यास सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली गेली असेल तर ती रद्द करण्याचे अधिकार आपणांस आहेत. याच सर्वोच्च अधिकाराचा वापर करून आपण आमच्या लाडक्या ‘महादेवी’ हत्तीणीला नांदणी मठाकडे सुखरूप स्वाधीन करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
भाजपचे हे फसवे हिंदुत्व, ढोंगीपणा मुंबई मनपा निवडणुकीत उघड करणार
एकीकडे भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष हिंदुत्ववादी असल्याचा टाहो फोडतात. पण लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नांदणी मठाच्या ‘महादेवी’ हत्तीणीबाबत भाविकांच्या भावना तीव्र असताना ते गप्प का आहेत? उलट आणखी तीन मठांतील माणसाळलेले हत्ती घेऊन जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे भाजपचे हिंदुत्ववाचे प्रेम बेगडी आहे. त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीवेळी मुंबईत जाऊन त्यांचा ढोंगीपणा उघड करणार, अशा प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह पदयात्रेत सहभागी तरुणांनी दिल्या.
… तुम्हाला याची किंमत मोजावी लागणार – राजू शेट्टी
प्राणिसंग्रहालयासंदर्भात काही कायदे आहेत. ते डावलून उभारण्यात आलेले गुजरातमधील वनतारा प्राणिसंग्रहालय बोगस आहे. याची कोठेही नोंद नाही. येथून प्राण्यांची तस्करी होत असल्याची आपल्याकडे माहिती असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित जनसमुदायासमोर बोलताना केला. ‘महादेवी’ प्रशिक्षित असल्याने तिचा खोटा अहवाल करण्यात आला. तेराशे वर्षांहून अधिक काळ या मठाला हत्ती सांभाळण्याचा अनुभव आहे. येथील वातावरण चांगले आहे. तर, गुजरातच्या जामनगरमध्ये तापमान 47 डिग्री असते. हत्तीला ते वातावरण पोषक नाही. ‘वनतारा’ला मान्यता नसताना त्यांना हत्ती देण्याची हिंमत झालीच कशी, असा सवाल करत येथून अश्रू गाळत, उपाशीपोटी ‘महादेवी’ गेली. त्यामुळे ‘अंबानी साहेब, तुम्ही कितीही मोठे असला, तरी एक दिवस तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल,’ असा इशाराही शेट्टी यांनी दिला.