
ओव्हलवर वळणा-वळणावर कसोटीला वळण मिळत होते. काल हॅरी ब्रूकचा झेल टिपताना सिराजकडून झालेली चूक आणि त्यानंतर त्याने केलेल्या सुस्साट खेळाने सामना पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने फिरवला होता. पण आकाशदीपने घेतलेली ब्रूकची विकेटच सामन्याला कलाटणी देणारी ठरली. इथूनच कसोटीने रंग बदलला आणि हिंदुस्थानने कमबॅक केले.
अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी फक्त 35 धावांची गरज होती आणि चार फलंदाज शिल्लक होते. यजमानांचा खेळ पाहता तेच जिंकणार अशी खात्री होती. हिंदुस्थानी संघाकडेही विजयाचा आत्मविश्वास नव्हता; पण सिराजने सलग षटकांत जॅमी स्मिथ आणि जॅमी ओव्हरटन यांच्या विकेट काढत संघात जो जोश भरला तो नंतर कमीच झाला नाही. पुढे विजयाची संधी दोघांना होती, पण जोशात असलेल्या हिंदुस्थानी सिराज-प्रसिधच्या जोडीने इंग्लंड चाहत्यांना बेशुद्ध करणारी किमया साधली. ब्रूक आणि रुटच्या शतकांनी हिंदुस्थानी विजयाच्या आशांना सुरुंग लावला होता, पण ब्रूक बाद झाला आणि सारे चित्रच पालटले. इंग्लंडला वाटलेली सहज विजयाची वाट अचानक अंधारात हरवली आणि मैदानात निःशब्दता पसरली. सामन्यातील हा क्षणच खरा टार्ंनग पॉइंट ठरला, ज्यामुळे हिंदुस्थानने पराभवाच्या दरीतून स्वतःला केवळ वाचवले नाही, तर इंग्लंड संघालाही विजयाच्या कडेवरून दरीत ढकलून दिले.
या विजयानंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी दाखवलेली चिकाटी, शिस्त आणि धैर्याचे सर्वत्र काwतुक केले जातेय. दुसरीकडे इंग्लंडसाठी हा पराभव पुन्हा एकदा जिव्हारी लागलाय.
या विजयाची सर कशालाच नाही – केएल राहुल
आपल्या कसोटी कारकीर्दीतील ही सर्वात थरारक आणि संस्मरणीय मालिका असल्याचे मत व्यक्त केलेय हिंदुस्थानी संघातील अनुभवी सलामीवीर केएल राहुलने. या ऐतिहासिक रोमहर्षक मालिकेने कसोटी क्रिकेटच्या भवितव्याला नवी दिशा दिली असून हे क्रिकेट जिवंत असल्याचेही अवघ्या जगाने पाहिल्याची प्रतिक्रिया राहुलने दिली.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पाचही कसोटी सामने थरारक आणि रोमहर्षक झाले. क्रिकेटच्या मूळ प्रकाराने वेगवान क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटपेक्षा आपणच सर्वोत्तम असल्याचे सिद्ध करताना कसोटी क्रिकेटचा उंचावलेला दर्जाही दाखवला. इंग्लंडने निर्भिडपणे खेळ करताना केलेल्या बॅझबॉलवर काहींनी टीका केली असली तरी त्याच खेळाने कसोटीचा थरार वाढवल्याचे दिसतेय, आणि त्याच्या वेगवान खेळाला उत्तर देण्यासाठी प्रतिस्पर्धी संघही जशास तसे उत्तर देतोय. या मालिकेत सलामीवीर म्हणून 532 धावा फटकावणारा राहुल म्हणाला, ही मालिका माझ्यासाठी सर्व काही आहे. मी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱया संघाचा भाग होतो, वर्ल्ड कप विजयही पाहिला आहे, पण या विजयाची सर कशालाच नाही. कसोटी क्रिकेट जिवंत आहे, आणि मजबूत असल्याचेही तो म्हणाला.