ठसा – सत्यपाल मलिक

जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल आणि मोदी सरकारवर विविध बाबतीत टीकेचे आसुड ओढणारे, त्या आरोपांचा न डगमगता वारंवार पुनरुच्चार करणारे सत्यपाल मलिक यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील राम मनोहर लोहिया इस्पितळात ते गेल्या काही काळापासून उपचार घेत होते. आमदार ते विविध राज्यांचे राज्यपाल असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारे सत्यपाल मलिक हे तसे बेधडक आणि थेट बोलणारे राजकारणी होते. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनाचा त्यांनी श्रीगणेशा केला. पुढे ते माजी पंतप्र्रधान चौधरी चरणसिंग यांच्या संपर्कात आले. 1974 मध्ये चरणसिंग यांच्या भारतीय क्रांती दलाच्या तिकिटावर बागपत विधानसभा निवडणूक त्यांनी जिंकली आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

भारतीय लोकदलाच्या माध्यमातून ते पहिल्यांदा राज्यसभेवर गेले. नंतरच्या काळात काँगेस, मग जनता दल, भाजप असा राजकीय प्रवास त्यांनी केला. केंद्रात मोदी सरकार आल्यावर ते जम्मू-कश्मीरचे राज्यपाल झाले. त्यांच्याच कार्यकाळात 370 कलम हटविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली. अर्थात ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले ते 14 फेब्रुवारी, 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून त्यांनी मोदी सरकारवर केलेल्या कठोर टीकेमुळे. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाल्याने देशभरात शोकसंतप्त वातावरण होते. तेथील राज्यपाल असलेल्या सत्यपाल मलिक यांनी या हल्ल्यावरून मोदी सरकारला जाहीरपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. हा हल्ला सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे झाला असे मलिक बोलले होते. एवढेच नव्हे तर या जवानांना हेलिकॉप्टरने नेण्याऐवजी बसने नेण्यात आले आणि त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली, असाही खळबळजनक आरोप त्यांनी केला होता.

पुढील काळातही त्यांनी या आरोपाचा अनेकदा पुनरुच्चार केला, पण अनेक महत्त्वाच्या आरोपांबाबत मौन धारण करणारे मोदी याही बाबतीत शेवटपर्यंत मूग गिळूनच बसले. या सर्व आरोपांमुळे मलिक यांची जम्मू-कश्मीरच्या राज्यपालपदावरून उचलबांगडी होणे स्वाभाविकच होते. मात्र म्हणून त्यांनी या आणि जम्मू-कश्मीरच्या किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी त्यांचे मत जाहीरपणे मांडणे थांबवले नाही. मिळेल त्या व्यासपीठावरून ते त्यांचे दावे, आरोप ठोसपणे करीतच राहिले. अगदी गेल्या महिन्यात राम मनोहर लोहिया इस्पितळात गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही त्यांनी ‘मी जिवंत असेन अथवा नसेन, मला देशवासियांना सत्य सांगायचे आहे,’ असे म्हणत ‘एक्स’ या समाज माध्यमावर खळबळजनक पोस्ट केली होती. त्यातही त्यांनी मोदी सरकारवर आरोप केले होते. ज्या निविदा प्रकरणी मलिक यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्या प्रकरणात सरकारने त्यांनाच अडकविण्याचा प्रयत्न केला होता. ज्या भ्रष्टाचाराची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली त्या प्रकरणात त्यांनाच गोवण्यात आले, त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. स्वतःला लोहियावादी म्हणवून घेणाऱ्या सत्यपाल मलिक यांचा संपूर्ण राजकीय प्रवास चढ-उताराचा आणि वाद-वादंगाचा राहिला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलन असो की, गोव्यातील भाजप सरकारवरील कोविड काळातील भ्रष्टाचाराचे आरोप असो, मलिक यांनी राज्यकर्त्यांना लक्ष केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यावरही त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या सर्व आरोपबाजीमुळे मलिक यांची राजकीय कारकीर्द शेवटच्या टप्प्यात चर्चेत राहिली, वादळी ठरली. त्यांच्या अनेक ‘सत्य’कथनामुळे मोदी सरकारला घाम फुटला. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही त्यांनी इस्पितळातून ‘मला देशाला सत्य सांगायचे आहे,’ अशी पोस्ट करून बरंच काही सांगायचा प्रयत्न केला. मात्र मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्याकडची मोदी सरकारची अनेक ‘सत्यं’ त्यांच्याबरोबरच काळाच्या उदरात कायमची गडप झाली.