Punjab news – मोहालीमध्ये ऑक्सिजन प्लांटमध्ये सिलिंडरचा स्फोट; दोन जणांचा मृत्यू, 3 जखमी

पंजाबमधील मोहाली येथे मोठी दुर्घटना घडली आहे. फेज-9 मधील औद्योगित क्षेत्रातील ऑस्किजन प्लांटमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये होरपळून दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. देवेंद्र आणि आसिफ अशी मृतांची नावे आहेत. जखमीना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फेज 9 मधील औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सिजन प्लांटमध्ये स्फोट झाला. सिलिंडरमध्ये जास्त दाब असल्याने स्फोट झाला असून स्फोटाच्या आवाजामुळे परिसरामध्ये घबराट पसरली. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल, वैद्यकीय पथके, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.

स्फोटामध्ये कारखान्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच दोन जणांचा मृत्यू झाला असून जखमींना फेज 6 मधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलीची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर लोकांनी कारखान्याबाहेर गर्दी केली आणि पोलीस व कारखाना व्यवस्थानाशी हुज्जत घातली. कारखान्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप लोकांनी केला आहे. अशा प्रकारचा अपघात येथे होऊ शकतो अशी भीतीही यापूर्वी व्यक्त करण्यात आली होती, मात्र कारखाना व्यवस्थापकाने त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप नागरिकांनी केला.