लोकशाही, संविधान आणि जनतेच्या हक्कांच्या रक्षणासाठी SIR चर्चा झालीच पाहिजे; अरविंद सावंत यांची मागणी

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला अचानक मतदारांची संख्या कशी वाढली? विधानसभा निवडणुकीत शेवटच्या एका तासात मतदान कसे वाढले, याबाबत आजही निवडणूक आयोग उत्तर देत नाही. याबाबतचे सीसीटीव्ही फूटेजही देण्यात येत नाही. या सर्व गोष्टी आश्चर्यचकीत करणाऱ्या आहेत. अशा प्रकारे लोकशाही आणि संविधानावर हल्ले करण्यात येत आहे. हा फक्त बिहार किंवा पश्चिम बंगालमधील निडणुकांचा प्रश्न नाही, हा देशाचा प्रश्न असून आम्ही सर्व विरोधी पक्ष त्यासाठी एकत्र आलो आहोत, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

आज जे बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये होत आहे, ते उद्या सर्व देशात होऊ शकते. मतदारांकडे त्यांच्या आई-वडिलांचे जन्म प्रमाणापत्र निवडणूक आयोगाकडून मागण्यात येते. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या मतदार पुनर्निरीक्षणाबाबत चर्चा घेण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. मात्र, निवडणूक आयोगाबाबत संसदेत चर्चा होऊ शकत नाही, असे ते सांगत आहे. मात्र, आम्ही निवडणूक आयोगावर नाही, तर सुधारणा,नियम आणि पुनर्निरीक्षणाबाबत चर्चेची मागणी करत आहोत. तरीही सरकार चर्चेसाठी तयार होत नाही. या मागणीसाठी विरोधी पक्ष एकत्र आलो आहोत. विरोधी पक्षाचे नेते सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत नाहीत, आम्हाला फक्त नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करायचे आहे. लोकशाही, संविधान आणि जनतेच्या हक्कांच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे.