आदित्य ठाकरे यांनी जहाजबांधणी मंत्र्यांची घेतली भेट; ससून डॉकमधील मच्छिमारांचा मुद्दा केला उपस्थित

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आदित्य ठाकरेही दिल्लीत असून त्यांनी बुधवारी उशिरा जहाजबांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील ससून डॉक येथील मच्छिमारांचा मुद्दा उपस्थित केला.

ससून डॉक येथील मच्छिमारां मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPA) आणि MFDC यांच्यातील वादामुळे त्रास होऊ नये, यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच वरळी, एन. एम. जोशी आणि वडाळा बीडीडी चाळींप्रमाणेच, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवरील शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. दोन्ही मागण्या सकारात्मकरीत्या विचारात घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी दक्षिण मुंबईचे खासदार आणि शिवसेना नेते अरविंद सावंत उपस्थित होते.

ससून डॉकमधील मासे विक्रीवरील बंदी उठवा! शिवसेनेची राज्य सरकारकडे मागणी

काय आहेत मागण्या?

मुंबई पोर्ट प्राधिकरणाने (MPA) MFDC सोबतचे मतभेद सोडवावेत आणि मुंबईतील ससून डॉक येथील मच्छीमार व्यवसायिकांना त्रास देऊ नये. MPA आणि MFDC ह्यांच्यातील वादामुळे ह्या मच्छिमार बांधवांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीवरून काढण्यात येईल अशी भीती आहे. जे आम्ही होऊ देणार नाहीच, परंतु हा त्रास बंद व्हावा.

शिवसेना कोळी बांधवांच्या पाठीशी ठाम! उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, ससून डॉकमधील व्यावसायिकांशी साधला संवाद

वरळी, एन.एम.जोशी आणि वडाळा ह्याप्रमाणे शिवडी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करावी (ही MPA ची जमीन आहे). असे केल्यास बीडीडी -शिवडीतील रहिवाशांसाठी आणि MPA साठी देखील हे फायदेशीर ठरेल. चाळींचा पुनर्विकास योग्यपद्धतीने करता येईल आणि म्हाडाप्रमाणे उत्पन्नही मिळवता येईल.