
पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात गावातील सरपंच असलेल्या पत्नीच्या पतीने हस्तक्षेपातून आर्थिक तडजोड करून प्रकार दडपल्याची माहिती समोर येत आहे.
संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांना काही आर्थिक मदत देऊन हा प्रकार मिटवण्यात आल्याची चर्चा गावात सुरू असून, सरपंचपतीच्या भूमिकेबाबतही नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने ‘पॉक्सो कायद्या’अंतर्गत हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. मात्र अजूनही संबंधित शिक्षकाविरोधात कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचे समजते. या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत पोलीस कारवाई झालेली नसून, स्थानिक पातळीवर दबाव आणि मध्यस्थीमुळे सत्य दडवले जात असल्याचा आरोप काही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पीडितेला न्याय मिळावा, आणि आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
स्थानिक प्रशासन आणि महिला बालकल्याण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, तसेच पोलिसांनी त्वरित चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी दबक्या आवाजात सुरू आहे.























































