जाऊ शब्दांच्या गावा – सर्व सुखांचा आरामु

<<< साधना गोरे >>>

मराठी भाषेत असे अनेक शब्द आहेत, जे मूळ कोणत्या भाषेतून आले हे सांगणं कठीण आहे. असाच एक संदिग्ध शब्द म्हणजे ‘आराम’. काहींना हा शब्द हिंदी-उर्दू भाषांमधला वाटतो, तर कुणाला हा फारसी वाटतो; पण हा आराम शब्द आजच्या बऱ्याच आधुनिक भारतीय भाषांमध्ये तर आहेच, पण संस्कृत, पाली आणि अवेस्ता या प्राचीन भाषांमध्येही तो विविध अर्थांनी वापरला गेला आहे.

मराठीत आराम म्हणजे विश्रांती, विसावा, आनंद, दुःख किंवा आजारापासून मुक्तता, स्वास्थ्य, सुखरूपता. कृ.पां. कुलकर्णींचा ‘व्युत्पत्तिकोश’, दाते-कर्वे यांचा ‘महाराष्ट्र शब्दकोश’ ते वा.गो. आपटेंचा ‘मराठी शब्दरत्नाकार’ यांमध्ये मराठीतला ‘आराम’ शब्द संस्कृतमधील ‘आराम’ शब्दापासून आल्याचं म्हटलं आहे. संस्कृतमध्ये त्याचा अर्थ आहे आनंद, प्रसन्नता, विश्रांती. शिवाय बाग, उद्यान या अर्थानेही हा शब्द वापरला गेला आहे. बाग, उद्यान या स्थानांचा उद्देश लक्षात घेतला तर लोक तिथे विश्रांती घेण्यासाठी, आनंदासाठीच जातात हे स्पष्ट आहे. संस्कृतमध्ये बागकाम करणाऱ्या माळ्याला ‘आरामिकः’ असाही शब्द आहे.

संस्कृतमधला ‘आराम’ हा शब्द मूळच्या ‘रम्’ शब्दापासून (धातूपासून) तयार झाला आहे. ‘रम्’ म्हणजे आनंददायक, सुखावह. या मूळच्या ‘रम्’ शब्दाला ‘आ’ हा उपसर्ग लागून ‘आराम’ शब्द तयार झाला. रम्’मध्ये अंत, बंद करणे, स्थिरावणे, थांबणे, मुक्काम करणे अशा अनेक अर्थछटा अंतर्भूत आहेत. खूप काम करून दमलेल्या शरीराच्या इंद्रियांना थांबवल्याने, त्यांना शिथिल केल्याने मनुष्याला एक प्रकारची शांती लाभते. ही शांती आनंद, उल्हास, प्रसन्नता निर्माण करते. असे सगळे अर्थ ‘आराम’ शब्दामध्ये सामावलेले आहेत. या ‘रम्’ शब्दाला ‘वि’ हा उपसर्ग लागून विराम शब्द तयार झाला आहे.

‘रम्’मधूनच रमण, रमणीय शब्द तयार झाले आहेत. रमण म्हणजे मनोहर, आनंददायक. यावरून प्रियकर, पती, कामदेव यांनाही रमण म्हटलं गेलं आहे. तसंच प्रेयसी, पत्नी, सुंदरी यांना ‘रमणी’ शब्द अनेक साहित्यिकांनी वापरला आहे. लक्ष्मीला रमा म्हटलं जातं, त्यातही हाच अर्थ आहे. त्यावरून विष्णूला रमाकांत, रमानाथ, रमापतीही म्हटलं गेल. रम्य, सुरम्य, मनोरम हे शब्दसुद्धा या ‘रम्’च्याच साखळीतले आहेत.

पाली भाषेतही ‘आराम’ शब्द आहे. त्याचा अर्थ आहे बाग, विहार. बाग हे तर सर्वसामान्यांसाठी विश्रांतीचं ठिकाण आहेच, पण प्राचीन काळी विहार हे बौद्धू भिक्षूंसाठी विश्रांतीचं म्हणजे आराम करण्याचं स्थान होतं. पालीमध्येही माळ्यासाठी ‘आरामपाल’ असा शब्द आहे. बौद्ध भिक्षूंचे संघ अशा विहारांमध्ये आराम करत, यावरून या विहारांना किंवा मठांना ‘संघाराम’सुद्धा म्हणत. सातव्या शतकात भारतात आलेल्या ह्यूएनत्संग या चिनी प्रवाशाने त्याच्या प्रवासवर्णनात नालंदा विद्यापीठातील विशाल संघारामचा उल्लेख केलेला सापडतो. याशिवाय तत्कालीन भारतात असे बरेच संघाराम असल्याचं दिसतं.

फारसी भाषेतही ‘आराम्’ शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे शांती, समाधान, स्वस्थ. पाली-संस्कृतमधील ‘आराम’चा अर्थ विहार, बाग असा होता; आणि ती शांती, समाधान मिळवण्याची ठिकाणं होती. मग फारसीत त्या आराम्’लाही अगदी त्याच साखळीतला अर्थ कसा प्राप्त झाला असेल, असा प्रश्न मनात निर्माण होतो. म्हणजे संस्कृत-पालीमधून फारसी भाषेत हा शब्द गेला की फारसीतून संस्कृत-पालीमध्ये आला? पण अशी काहीच शक्यता नाही. त्याचं स्पष्टीकरण असं देता येईल की, फारसी भाषेचं पूर्वरूप ज्या भाषेला म्हणता येईल ती भाषा म्हणजे अवेस्ता. ही अवेस्ता भाषा आणि संस्कृत यांच्यामध्ये व्याकरण, शब्दसंपदा इ. बाबतीत खूप साम्य आहे. अवेस्ता भाषेतील ‘आराम’ शब्द फारसीत काहीसा अर्थबदल होऊन आला.

आता फारसीतल्या या अर्थासह दक्षिणेकडच्या कानडी भाषेसह मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, बंगाली, पंजाबी, कश्मिरी, उडिया, आसामी, सिंधी या भाषांमध्येही दिसतो. मराठीत आरामशीर, आरामदायक, ऐषआराम किंवा ऐशाराम, आरामखुर्ची असेही शब्द तयार झाले आहेत. कानडीत ‘आराम’चं एक रूप ‘आरामु’ असंही आहे. त्यावरून आठवलं, ‘ज्ञानेश्वरी’तील एका ओवीतही ‘आरामु’ हा शब्द आहे – ‘तैसा हृदयामध्ये मी रामू। असता सर्व सुखांचा आरामु। की भ्रांतासि कामु। विषयांवरी ।।

पुढील लेखात ‘राम’ आणि त्यावरून आलेले शब्दप्रयोग पाहू या. मराठी जनमानसाच्या दैनंदिन जीवनात ‘रामा’चे शब्दप्रयोग किती खोलवर रुजलेले आहेत याचा अंदाज येईल.

[email protected]