सोमवारी इंडिया आघाडीची निवडणूक आयोगावर धडक, मतचोरीवरून राहुल गांधींच्या हल्ल्यानंतर वातावरण तापू लागले

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे मतचोरी केली याचा बॉम्ब लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फोडला. यानंतर सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगाविरोधात देशभरात वातावरण तापू लागले आहे. निवडणूक घोटाळ्याविरुद्ध संसद तसेच संसदेबाहेर लढा उभारण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत घेतला आहे. त्यानुसार सोमवार 11 ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली.

बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष पडताळणीच्या मुद्दय़ावर मोदी सरकार संसदेत चर्चेपासून पळ काढत आहे. मतचोरी व मतदार यादीतील घोटाळ्यावर निवडणूक आयोग गप्प आहे. हा विषय संसदेत उपस्थित करायच्पा म्हटला तर विरोधी पक्षांना दहा सेकंद बोलण्याचीही संधी मिळत नाही, असा आरोप कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे केला.

भाजप व निवडणूक आयोग मिळून जी मतांची चोरी व घोटाळे करत आहे याचा जाब विचारण्यासाठी संसद भवन ते निर्वाचन सदन असा मोर्चा 11 ऑगस्टला काढण्यात येईल. यात इंडिया आघाडीतील सर्व विरोधी पक्षांचे खासदार सहभागी होणार असल्याची माहिती खरगे यांनी दिली. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, तृणमूलच्या सागरिका घोष, द्रमुकचे तिरुची सिवा, काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल, प्रमोद तिवारी, सय्यद नासीर हुसैन, राजदचे मनोज झा, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, माकपचे जॉन ब्रिटास आदी उपस्थित होते. दरम्यान, बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीवरून गदारोळ झाल्याने संसद आजही ठप्प झाली.

निवडणूक आयोगावर राज्यसभेत अनेकदा चर्चा

निवडणूक आयोगाच्या नियमांवर राज्यसभेत 1961, 1981, 1991, 2015 आणि 2019 मध्ये चर्चा झाल्या होत्या. मोदी सरकारच्या काळात 2015 मध्ये झालेल्या चर्चेत विधी व न्याय मंत्री सदानंद गौडा यांनी विरोधी पक्षांच्या सूचना विचारात घेण्याचे आश्वासन दिले होते. 2019 मध्ये झाले चर्चेत मंत्री रविशंकर प्रसाद सहभागी झाले होते याकडे लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी लक्ष वेधले आहे.

संसदेला जगातील कुठल्याही विषयावर चर्चेचा अधिकार

संसदेला जगातील कुठल्याही विषयावर चर्चा करण्याचे अधिकार असल्याची ग्वाही राज्यसभेत तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी दिली होती याचे स्मरण खरगे यांनी पत्रकार परिषदेत करून दिले. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी यांची मते कापली जात असून स्थलांतरित कामगारांचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत. एसआयआरवर चर्चा करण्यावर सर्व विरोधकांची एकजूट असून सरकारचाच विरोध आहे. सरकार घटनेला जुमानत नसल्याचा निष्कर्ष यातून निघतो, असेही खरगे म्हणाले.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारच्या मतदार याद्या वेबसाइटवरून गायब

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या राज्याच्या मतदार याद्याच वेबसाइटवरून गायब करून टाकल्याचे समोर आले. चोराने चोरी केली आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. आता चोर कुठेही लपला किंवा चोराने कितीही लपवाछपवी केली तरी काय फरक पडतो? चोरी तर सिद्ध झालीच आहे, अशी पोस्ट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मते चोरून मोदी पंतप्रधान

मोदी मतचोरी करून पंतप्रधान झाले हे आम्ही सिद्ध करू. इलेक्ट्रॉनिक डेटा देत नसाल तर आमच्याकडे कागदी प्रती आहेत. तुमची मतचोरी लपू शकत नाही. भाजपने 35 हजारांपेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या 25 जागांचे सत्यही आम्ही समोर आणू, असे राहुल म्हणाले.

मतचोरी हा केवळ निवडणूक घोटाळा नाही, तर संविधान आणि लोकशाहीचा विश्वासघात आहे. गुन्हेगारांनी ऐकावे, एक दिवस परिस्थिती बदलेल. सर्वांना शिक्षा होईल.

राहुल गांधींचे 5 प्रश्न

  1. मतदार यादीचा डिजिटल डेटा का दिला जात नाही?

2. निवडणुकीचे व्हिडीओ फुटेज का हटवले जातेय?

3. मतदार यादीत घोटाळा कशासाठी केला जातोय?

4. निवडणूक आयोग भाजपच्या एजंटसारखा का वागतो?

5. विरोधी पक्षांना धमक्या कशासाठी दिल्या जातात?

80 मतदारांची नोंद असणारे घर भाजप नेत्याचे

कर्नाटकातील महादेवपुरातील बूथ क्रमांक 470 मध्ये मुनी रेड्डी गार्डनमधील घर क्रमांक 35 मध्ये 80 मतदारांच्या नावाची नोंदणी असल्याचे राहुल गांधी यांनी उघडकीस आणले आहे. अवघ्या दहा-पंधरा चौरस फूट आकाराच्या या घरात एवढे लोक कसे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत माध्यमांनी पडताळणी केली असता हे घर भाजपशी संबंधित जयराम रेड्डी यांचे असल्याचे स्पष्ट झाले. रेड्डी यांनी कबुलीही दिली. अनेक भाडेकरू वर्षानुवर्षे तेथे राहत होते आणि त्यांनी मतदार म्हणून त्यांची नावे नोंदवली. त्यापैकी बहुतेक जण अजूनही मतदान करण्यासाठी येतात, असे रेड्डी यांनी सांगितले.