जम्मू-कश्मीरच्या कुलगाममध्ये नवव्या दिवशीही चकमक सुरू; 2 जवान शहीद, एका दहशतवाद्याचा खात्मा

फाईल फोटो

जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखाल भागामध्ये गेल्या नऊ दिवसांपासून चकमक सुरू आहे. शुक्रवारी रात्रीही दोन्ही बाजुने जोरदार गोळीबार सुरू होता. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले असून 10 जवान जखमी झाले आहेत. तसेच एका दशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

हिंदुस्थानी लष्कराने 1 ऑगस्टला जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन अखल’ सुरू केले होते. अखाल भागामध्ये दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. याला सुरक्षा दलाचे जवानही जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. घनदाट जंगल, नैसर्गिक गुहांमध्ये याचा वापर दहशतवादी करत आहेत.

सुरक्षा दलाने या भागाला चौफेर वेढा घातला असून आतापर्यंत एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. दहशतवाद्याचा मृतदेहही हाती लागला आहे. या कारवाई दरम्यान दोन जवान शहीद झाले आहेत. लान्स नायक प्रितपाल सिंग आणि शिपाई हरमिंदर सिंग अशी शहीद जवानांची नावे आहेत, अशी माहिती लष्कराने दिली आहे.