बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांकडे दोन मतदार ओळखपत्र; तेजस्वी यादव यांचा आरोप

बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यानंतर आता बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्याकडे दोन मतदार ओळखपत्रे असल्याचे समोर आले आहे. सिन्हा यांना दोन एपिक क्रमांक मिळाले आहेत. मतदार यादीत सिन्हा यांचा एपिक क्रमांक लखीसराय आणि पाटण्याच्या बांकीपूर विधानसभेच्या नावावर नोंदवला आहे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला.

तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेदरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर दोन्ही एपिक क्रमांक ऑनलाइन तपासले. पुढे ते म्हणाले, आम्ही बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीवरून आरोप करत आहोत. एकतर विजय सिन्हा यांनी दोन ठिकाणी स्वाक्षरी केली असावी किंवा निवडणूक आयोगाने फसवणूक केली असेल, अन्यथा बिहारचे उपमुख्यमंत्रीच बनावट आहेत, अशी टीकाही तेजस्वी यादव यांनी केली. निवडणूक आयोगाने मला स्पीड पोस्टने नोटीस पाठवली. तेव्हा मीही स्पीड पोस्टने नोटीस पाठवली. पाटणा जिल्हा प्रशासन आणि लखीसराय जिल्हा प्रशासन उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांना नोटीस पाठवेल का? असा सवाल निवडणूक आयोगाला केल्याचे तेजस्वी यादव यांनी केला.