देवदारच्या बेसुमार कत्तलीने धरालीत हाहाकार

उत्तरकाशीतील धराली येथे झालेली ढगफुटी आणि भूस्खलनामुळे उडालेला हाहाकार देवदारची झाडे रोखू शकत होती, असे पर्यावरण तज्ञांनी म्हटले आहे. तसेच उत्तराखंड येथील उंचावरील भागात आणि ट्रान्स हिमालय म्हणजेच समुद्र सपाटीपासून तब्बल 2 हजार मीटर उंचावर देवदारच्या झाडांचे अक्षरशः जंगल होते, परंतु येथे मोठय़ा प्रमाणावर झालेल्या बांधकामांसाठी झाडांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल करण्यात आली. परिणामी, नैसर्गिक आपत्ती ओढवली असेही पर्यावरण तज्ञांनी म्हटले आहे.

नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेल्या धरालीच्या वरच्या भागात गंगोत्री असलेल्या हिमालय परिसरात देवदार झाडांची मोठी संख्या होती, परंतु 1830 मध्ये इंडो-अफगाण युद्धातून काढता पाय घेतलेल्या इंग्रज अधिकारी फेडरिक विल्सनने हर्षिल येथे देवदार झाडांची कत्तल सुरू केली. ही कत्तल आजतागायत सुरू असल्याचा दावा इतिहासाचे प्राध्यापक शेखर पाठक यांनी केला. देवदारची झाडे मुळासकट उपटून येथे इमारती, हॉटेल्स उभी राहिल्याचे पाठक यांनी सांगितले.

केवळ 300 झाडेच

ज्या मार्गावर सर्वाधिक विध्वंस पाहायला मिळाला, त्या मार्गावर मोठय़ा प्रमाणावर देवदारची झाडे होती. मात्र सध्या येथे एक किलोमीटरमध्ये केवळ 200 ते 300 झाडेच आहेत. ही झाडेही नवीन आणि अतिशय कमजोर आहेत. गावापर्यंत जाणाऱ्या ज्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर भूस्खलन झाले तेथेही मोठय़ा प्रमाणावर देवदारची झाडे होती, परंतु त्यांची संख्या घटल्यामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवली. देवदारचे घनदाट जंगलच नष्ट झाल्याचे पर्यावरण तज्ञांनी सांगितले.

हिमालयातील नागरिक देवदारची करतात पूजा

हिमालयातील रहिवासी देवदारच्या झाडांची देवाप्रमाणे पूजा करतात. देवदारचे जंगल खूप घनदाट असते. ही झाडे जमिनीची धूप होऊ देत नाहीत. त्यामुळे निसर्गाचा प्रकोप होत नाही. उलट नैसर्गिक आपत्तीपासून येथील नागरिकांचे संरक्षणच होते. त्यामुळे हिमालयातील नागरिक देवदारच्या झाडांना देव मानून त्यांची पूजा करतात, असेही प्राध्यापक शेखर पाठक यांनी सांगितले.

गंगा नदीची पातळी धोक्याबाहेर पाटणा, लखनऊ बुडाले

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती असून पाटणा, लखनऊ अक्षरशः बुडाले. जिकडे-तिकडे गुडघाभर पाणी साचले असून त्यातून वाट काढताना नागरिक दिसत आहेत. अयोध्येत सातत्याने पाऊस पडत असून शरयू नदीलाही पूर आला आहे.